भाजपाने शिवसेनेची फसवणूक केली असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीमध्ये केला आहे. भाजपा आणि शिवसेनेचं सत्तास्थापनेचं काही ठरत नसल्याने काँग्रेसचे नेते सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा द्यावा अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्याबाबत चर्चेसाठीच अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ सोनिया गांधींना भेटण्यासाठी गेले आहेत. मात्र सोनिया गांधी यांची आणि या शिष्टमंडळाची भेट अद्याप झालेली नाही. दरम्यान भाजपाने शिवसेनेला फसवलं आहे असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसंच आमची सध्याची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेच्या पाठिंब्यावरुन काँग्रेसमध्येच दोन गट पडलेले पाहण्यास मिळाले. कारण सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये असे म्हटले आहे. काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला मुळीच पाठिंबा देऊ नये असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. तर भाजपा आणि शिवसेनेच्या भांडणात काँग्रेसने पडायची गरज नाही असं निरुपम यांनी म्हटलं आहे. या सगळ्यामुळे काँग्रेसमध्येच पाठिंबा द्यायचा की नाही यावर एकमत नसल्याचं चित्र आहे.

दरम्यान आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आपल्या बळावर सरकार स्थापन करु शकते असा दावा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. संख्याबळ कुठून आणणार या प्रश्नाला संजय राऊत यांनी बगल दिली. मात्र त्यांनी हा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेने सत्तेत समान वाटा मागितल्याने आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितल्याने सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे.