महाराष्ट्रातील धरणामधील पाणी नद्यांमध्ये खेळवून, दुष्काळी भागात वळवण्याच्या योजनेबाबत मी महिन्याभरापूर्वीच भूमिका मांडली होती. मात्र, भाजपाने आमची योजना जशीच्या तशी कॉपी करून, नदीजोड प्रकल्प जाहीरनाम्याच्या माध्यमातून समोर आणला आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर केला.

पुणे शहरातील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी हा आरोप केला. याप्रसंगी शहर अध्यक्ष मुनवर कुरेशी, महासचिव नवनाथ पडळकर, सचिन माळी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात सत्तेमध्ये येण्यापूर्वी तरुणांच्या हाताला रोजगार दिला जाईल. अशी घोषणा भाजपाकडून करण्यात आली. मात्र, त्या घोषणेचे मागील पाच वर्षात काही झाले नाही. उलट या पाच वर्षात दोन लाख कंपन्या बंद पडल्या आहेत. यामुळे लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. मात्र यावर सरकारकडून कोणताच मंत्री किंवा अधिकारी काही बोलत नाही. आता अजून नवनवीन घोषणा देण्यावर पुन्हा भर देण्यात येत आहे. अशा शब्दात भाजपावर त्यांनी निशाणा साधला. तसेच, वंचित आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.