भाजपाला अजूनही शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने सहकार्य केले नाही तर पाठिंब्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करु असे भाजपाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले. विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा विश्वास नसेल तर भाजपा सत्ता स्थापनेसाठी दावा करणार नाही असेही या मंत्र्याने स्पष्ट केले आहे.

आमच्याकडे नंबर नाही हे आम्हाला माहित आहे. शिवसेना आमच्यासोबत येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला मदत केली होती. तशाच प्रकारच्या मदतीसाठी आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा करु शकतो असे मंत्र्याने सांगितले. निकाल जाहीर झाल्यानंतर २४ ऑक्टोंबरपासून आम्ही सातत्याने शिवसेनेशी संर्पक साधण्याचा प्रयत्न करत आहोत.

आणखी वाचा- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर गॉड गिफ्ट”

पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीय. शिवसेनेच्या मागण्या आम्हाला अव्यवहार्य वाटतात. २८८ आमदारांपैकी आम्ही १०५ तर शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला आहे असे भाजपाच्या नेत्याने सांगितले. प्रक्रियेनुसार राज्यपाल सर्वात मोठया पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देतील. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांच्या पक्षांना विचारणा केली जाईल. सर्व पर्याय झाल्यानंतर राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील असे मंत्र्याने सांगितले.