कमी जागा मिळण्याच्या चिंतेने इच्छुक धास्तावले

कोल्हापूर : शिवसेनेने कोल्हापुरात आठ मतदारसंघांमध्ये उमेदवारीचे पत्रही दिले. दहापैकी आठ जागांवर शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर करून टाकल्याने केवळ दोनच मतदारसंघ भाजप व मित्रपक्षांच्या वाटय़ाला येणार असून, त्यातूनच भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभेच्या दोन्ही जागांवर भगवा फडकावलेल्या शिवसेनेने जिल्ह्य़ातील आठ मतदारसंघ लढणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ात भाजप किंवा जनसुराज्य पक्षाच्या वाटय़ाला जास्त जागा येतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. विधानसभेची उमेदवारी मिळणारच असा विश्वास मिळल्याने भाजपच्या काही इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आता त्यापैकी काहींना बंडाचा झेंडा खांद्यावर घेण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कागलमध्ये संजय घाटगे यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिल्याने म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यासह भाजपला धक्का बसला आहे.

गेल्या वेळी सहा मतदारसंघांमध्ये शिवसेनेने विजय संपादन केला होता. त्यानंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आदी निवडणुकांत शिवसेनेला यश मिळाले, पण भाजपच्या तुलनेत ते डावे होते. भाजप हा उत्तरोत्तर प्रबळ होत गेला.

भाजपमध्ये चलबिचल

निवडणुकीची जोरदार तयारी करून भक्कम मतपेढी बांधलेल्यांमधील काही जण बंडखोरी करतील असे चित्र निर्माण झाले आहे. म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी तर भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून गेली चार वर्षे कागल मतदारसंघातील खेडोपाडी पिंजून काढली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घाटगे यांच्या मागणीनुसार भरीव निधी दिल्याने विकासाचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावतानाच विधानसभा काबीज करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली होती. अशातच गेल्या आठवडय़ात महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून कागलची जागा भाजपला मिळणार असल्याचे संकेत दिले. माजी आमदार संजय घाटगे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने दुसरे घाटगे कोंडीत सापडले आहेत. याबाबत बुधवारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडणार असल्याचे समरजित घाटगे यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शिवसेनेला बंडखोरीची भीती

कागल व चंदगड या मतदारसंघांत शिवसेनेला बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. चंदगडमध्ये संग्रामसिंह कुपेकर यांना उमेदवारी मिळाल्याने जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर व महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ सदस्य, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे हे नाराज झाले आहेत. खांडेकर यांच्या समर्थकांनी स्वतंत्र राहण्याच्या दृष्टीने प्रचार सुरू केला आहे.