सध्या महाराष्ट्रात अभुतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते असते तर महाराष्ट्रात सध्या जे आहे त्यापेक्षा वेगळं चित्र असतं अशी भावना समर्थक व्यक्त करत आहेत. एकनाथ खडसे यांनीच स्वत: जळगावमधील आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.

“आपल्याला हजारो लोकांचे फोन आले. हजारो लोक भेटून गेले. अनेकांनी आपल्याला नाथाभाऊ तुम्ही आज राजकारणात असता तर युती तुटली नसती. महाराष्ट्रात हे चित्र नसतं. सध्या जे संकट आलं आहे तेदेखील आलं नसतं. समाजाला एक वेगळी दिशा मिळाली असती असं सांगतात,” अशी खंत एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलून दाखवली.

यावेळी एकनाथ खडसे यांनी एसीबीने ७० हजार कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणं बंद करण्यावरही प्रतिक्रिया दिली. ही सर्व प्रकरणे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित नसल्याचा दावा ‘एसीबी’ने केला असला तरी अजित पवार यांना दिलासा देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. एकनाथ खडसे यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला गेलेला नसून योगायोग असल्याचं म्हटलं आहे.