अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

भाजपचे सरकार मस्तवाल आणि माणुसकीशून्य आहे, अशी टीका वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरीतील सभेत बोलताना केली. निवडणुका होण्यापूर्वीच हे सरकार २८० जागाजिंकण्याचा दावा करते. मग, निवडणुका कशाला घेता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पिंपरीतील तीनही मतदार संघातील वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले, की सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूरच्या दुष्काळी पट्टय़ात ओरड झाल्याशिवाय छावण्या उभारल्या जात नाहीत. यंदा त्या पावसाळा सुरू झाल्यावर छावण्या उभारण्यात आल्या. १५ दिवस पाण्यात असणाऱ्या कोल्हापूर, सांगलीतील रहिवाशांना सरकारने मदत केली नाही. मुख्यमंत्री विमानातून घिरटय़ा मारून निघून गेले. तर, मंत्री गिरीश महाजन सेल्फी काढत बसले. असे माणुसकीशून्य सरकार पुन्हा नको आहे.

देशातील मंदीची लाट नैसर्गिक नाही. या संदर्भात सरकारकडे ठोस उपाययोजना नाही. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अर्थमंत्र्यांचे पतीच माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांचा सल्ला घेण्याचे विधान करतात, यातच सर्व काही आले. दोन बँका यापूर्वीच बुडाल्या आहेत, आणखी ५ राष्ट्रीयीकृत बँकांची अवस्था तशीच होणार आहे. त्यासाठी मस्तवाल झालेले सरकार वठणीवर आणले पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

अपेक्षित राजकीय वातावरण नसले, की भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जातो. निवडणूक भावनिक पातळीवर नेऊन सत्ता मिळवायची आणि नंतर आश्वासने विसरायची, हीच त्यांची कार्यपद्धती आहे. नागरिकांनी खोटय़ा राष्ट्रवादात अडकता कामा नये, असेही आवाहन आंबेडकर यांनी केले.