परभणी : शेकडो वर्षांपासून तीन तलाकच्या माध्यमातून मुस्लीम भगिनींचे शोषण होत होते. या प्रथेला थांबवण्याचे काम भाजप सरकारने केले. दहशतवादाविरुद्धही भाजप सरकारने कठोर पावले उचलल्याने आज दहशतवाद आणि नक्षलवाद संपविण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी केले.

जिंतूर-सेलू मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सेलू येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकत्रे उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबाला शौचालयाचा लाभ देण्यात आला. आता २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न आहे. दहशतवाद संपून भ्रष्टाचारमुक्त भारत करत असताना कोणत्याही विशिष्ट धर्माचा अनुनय न करता विकासाच्या प्रक्रियेत सर्वाना सहभागी करून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी जात, धर्म, भाषा या मुद्दय़ांवरून भेद करत राजकारण केले जायचे, आता देशातले गोरगरीब, शेतकरी, तरुण या सर्वाना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जात आहे, असेही ते म्हणाले.

अनुच्छेद ३७० कलम हटवून देशातला दहशतवाद मोडून काढण्याचे काम भाजप सरकारने केले. उत्कृष्ट भारताची परिकल्पना राबविण्याचे काम सध्या सुरू असल्याचे योगी म्हणाले.