भाजपाच्या विजयी आमदारांची ३० तारखेला विधान भवनात बैठक घेतली जाणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. भाजपाचे १०५ विजयी आमदार या बैठकीला हजर राहतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. आजच मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाकडून सत्तेचं सूत्र लेखी स्वरुपात घ्यायचं यावर शिक्कामोर्तब झालं. तसंच अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे अशीही मागणी विजयी आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली.

आता या पार्श्वभूमीवर भाजपाच्या बैठकीत काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना अडीच अडीच वर्षे या फॉर्म्युलावर ठाम आहे. अशात आता भाजपा ही अट मान्य करणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्रीपदाचं काहीही ठरलेलं नाही. सत्तास्थापनेचं काय करायचं हे अमित शाह आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं ठरलं आहे. त्यामुळे त्याप्रमाणे निर्णय होईल असंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- “अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ”

शिवसेनेला २०१४ च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत मात्र त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. कारण भाजपाला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची गरज लागणार हे निश्चित आहे. भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही बहुमतासाठी लागणारा १४५ आकडा भाजपाला गाठणं कठीण आहे त्यामुळे शिवसेनेला सोबत घेऊनच भाजपाला जावं लागणार आहे. युतीधर्म पाळून सरकार सत्तेवर आलं अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दोन्ही पक्षांमध्ये वाटायचं ही शिवसेनेची मुख्य अट आहे. आता भाजपा ही अट मान्य करणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.