गुरूवारी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. तिघांमध्ये कोणतीही समान विचारधारा नाही. त्यांच्या केवळ सत्तेची लालसा असल्याचा आरोप शाह यांनी केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाही तर शिवसेनेनं भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला असल्याचं शाह म्हणाले.

अजित पवारांना आपल्यासोबत घेण्याचा निर्णय योग्य होता किंवा नाही याबाबत सांगता येणार नाही, असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. अमित शाह यांनी गुरूवारी झारंखंडचा दौरा केला. त्यावेळी झारखंडमधील एका वृत्तवाहिनीनं त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमच्या पाठित खंजीर खुपसला नाही. तर तो शिवसेनेने खुपसला असं शाह यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस कायम भाजपाविरोधात लढत आली आहे. परंतु शिवसेना सोबत होती. त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे, असं ते म्हणाले.

जेव्हा विश्वासघात होतो, तेव्हा राग येणं हे स्वाभाविक आहे. याविषयावर आणखी काहीही बोलणं योग्य वाटत नाही. परंतु भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार नाहीत, असं शाह म्हणाले. राज्यात काय घडलं याची माहिती संपूर्ण देशाला आहे. आम्ही निवडणूक एकत्र लढवली. जनतेनं आपला कौल भाजपाला दिला होता. निकालानंतर मात्र शिवसेनेनं वेगवेगळ्या मागण्या पुढे केल्या, असंही त्यांनी नमूद केलं. अनेकदा सभांदरम्यानही युती सत्तेत आल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं म्हटलं होतं. भाजपानं कधीही घोडेबाजार केला नाही आणि करण्याचा प्रयत्नही केला नाही. काँग्रेस हा घोडेबाजार करणारा पक्ष आहे. त्यांनी संपूर्ण तबेलाच खरेदी केला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.