बहुसंख्य विद्यमान आमदारांना विरोध

भारतीय जनता पक्षात जिल्ह्य़ात ‘इन्कमिंग’ वाढले असले, तरी त्यामुळे पक्षातील दुसऱ्या फळीतील, निष्ठावान कार्यकर्त्यांत असंतोष निर्माण झाला आहे. काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध वाढु लागला आहे, पक्षातून ‘आउटगोइंग’ही सुरु झाले आहे. पक्षातील जिल्ह्य़ातील सूत्रेही पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याऐवजी नव्यानेच आलेले गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सरकली आहेत. युतीचे जागा वाटप व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा असंतोष अधिकच उफाळून येण्याची शक्यता आहे.

पक्षातील इच्छुकांना उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा असली, तरी आताच पक्षाच्या यादीवर इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांचेच प्राबल्य राहणार आहे, याचे चित्र आताच स्पष्ट होत आहे. अकोल्यात पिचड पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश करताच तेथील भाजपचे जिल्हा परिषद डॉ. किरण लहामटे व सुनीता भांगरे, अशोक भांगरे आदींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. कोपरगावमध्ये नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपण निष्ठावंत असल्याकडे लक्ष वेधले आहे तर विखे यांचे मेहुणे, काँग्रेसचे जि.प. सदस्य राजेश परजणे यांनी पक्षात उमेदवारीसाठी ‘लॉबिंग’ सुरु केले.

नेवाश्यातील सचिन देसरडा व इतर पदाधिकाऱ्यांनी बाहेरहून आलेल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पुन्हा उमेदवारी नकोच, असा सूर लावला आहे. पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांनाही पक्षातून विरोध सुरु झाला आहे. त्यांना विखे समर्थकांची साथ मिळते आहे. त्यामुळे राजळे व त्यांचे विरोधक या दोन्ही बाजूंनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धाव घेतली आहे. राहुरीतही मूळचे भाजपमधील कदम गटाचा विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांना विरोध आहे. तेथे नगराध्यक्ष सत्यजित कदम उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

पालकमंत्री शिंदे यांच्या कर्जत-जामखेडमध्ये ‘आउटगोइंग’चे प्रमाण जिल्ह्य़ात अधिक आहे. माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचे बंड खासदार डॉ. सुजय विखे यांच्या मध्यस्थीने तूर्त थंडावले असले तरी त्यासाठी पालकमंत्री शिंदे यांना विखे यांची मदत घ्यावी लागली. शिंदे समर्थक जामखेडचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, राशिनमधील युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शिवकुमार सायकर आदींनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. श्रीगोंद्यातही माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासंबंधित साईकृपा साखर कारखान्यावर, शेतक ऱ्यांची थकबाकी देण्याठी जप्तीची प्रक्रिया सुरु झाल्याने त्यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

निवडणूक काळात जिल्ह्य़ात पक्षाची धुरा संभाळण्याऐवजी पालकमंत्री शिंदे यांना राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यामुळे मतदारसंघातच अडकून पडले आहेत. परिणामी पक्षाची निवडणूक काळातील सूत्रे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे गेल्याचे चित्र आहे.

कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होऊ नये

पक्षात मोठय़ा प्रमाणावर ‘इन्कमिंग’ सुरु असले तरी केंद्र व राज्यातही सत्ता असल्याने जुन्या कार्यकर्त्यांचाही योग्य मान सन्मान ठेवला गेला आहे आणि तसाच तो भविष्यातही ठेवला जाईल. जेथे पक्षाची ताकद कमी होते, तेथेच प्रवेश दिले गेले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अस्वस्थ होऊ नये. उमेदवारी जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व जण एकदिलाने काम करतील, असा विश्वास आहे.– प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप