News Flash

भाजप अंतर्गत राजकारणात खडसेपर्व अस्ताकडे

२००९ ते २०१४ या कालावधीत खडसे हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

(संग्रहित छायाचित्र

जितेंद्र पाटील, जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीचे सरपंच ते मंत्रिपदापर्यंत मजल मारणाऱ्या एकनाथ खडसेंमुळे खऱ्या अर्थाने खानदेशात भाजपची पाळेमुळे रुजली. भाजपला ओबीसी चेहरा मिळवून देण्यात खडसे नेहमीच एक पाऊल पुढे राहिले. परंतु, पक्ष अंतर्गत राजकारणामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीला असे काही ग्रहण लागले की, त्यांना भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळणेही कठीण होऊन बसले. अखेर त्यांच्याऐवजी मुलीला उमेदवारी देऊन नाथाभाऊंना जणू काही त्यांची राजकीय कारकीर्द अस्ताकडे चालल्याची जाणीव करून देण्यात आली.

शेतकरी कुटुंबाची पाश्र्वभूमी असलेले एकनाथ खडसे १९८७ मध्ये सर्वप्रथम कोथळीचे सरपंच झाले. मुक्ताईनगरमधून १९९० मध्ये पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले. तेव्हापासून २०१४च्या निवडणुकीपर्यंत त्यांचे मुक्ताईनगर मतदारसंघावर वर्चस्व राहिले. १९९५ ते १९९९ या कालावधीत खडसे हे महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये अर्थमंत्री आणि पाटबंधारेमंत्री राहिले. या कालावधीमध्ये राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प मंजूर झाले. कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत पाटबंधारे प्रकल्पांना गती मिळाली. ‘आधी पुनर्वसन, मग पाटबंधारे प्रकल्प’ असा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत त्यांनी उत्तर महाराष्ट्रासाठी तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. तापी नदीचे गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी ठिकठिकाणी बंधारे आणि धरण बांधण्याचे नियोजन केले. त्यासाठी निधीची तरतूदही केली.

२००९ ते २०१४ या कालावधीत खडसे हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये खडसे यांच्याकडे महसूल, कृषी, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे मंत्रिपद होते. खडसे यांना जून २०१६ मध्ये जमीन घोटाळ्याच्या आरोपांवरून मंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले. भोसरी प्रकरण वगळता बाकी सर्व आरोपातून त्यांना सरकारी तपास संस्थांकडून नंतर निर्दोष ठरविण्यात आले. परंतु, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सहभागी होण्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. संपूर्ण सत्ताकाळात त्यांना भाजपने पुनरागमनासाठी झुलवत ठेवले. पक्षातील निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवून खानदेशची सर्व सूत्रे त्यांचे एकेकाळचे सहकारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली.

पक्षाकडून सातत्याने खच्चीकरण होत असताना, निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यावर तरी भाजपकडून आपल्याला न्याय मिळेल, या आशेवर खडसे होते. मात्र, पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारीच नाकारली. त्यांचा राग शांत करण्यासाठी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. सक्रिय राजकारणातील सहभाग संपल्याने नाथाभाऊ यांच्या राजकीय पर्वाचा जळगाव जिल्ह्य़ाच्या राजकारणातून अस्ताकडे प्रवास सुरू झाल्याचे हे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 2:54 am

Web Title: bjp internal politics end eknath khadse career zws 70
Next Stories
1 राज्यात एक कोटी तरुण मतदार
2 प्रदूषणकारी कारखान्यांवर बडगा?
3 शिवसेनेच्या प्रचारासाठी भाजपला आदेशाची प्रतीक्षा
Just Now!
X