राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आमची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे असं भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला बोलावलं. मात्र शिवसेनेला चोवीस तासांच्या आत त्यांचा दावा सिद्ध करता आला नाही.

आज दिवसभर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी चर्चा करुनही शिवसेनेला त्यांच्या पाठिंब्याची पत्र मिळू शकली नाहीत. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे गेले. आम्हाला मुदत द्या अशी मागणी त्यांनी केली मात्र ही मुदत त्यांना देण्यात आली नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली तसंच सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. मात्र या सगळ्याचा उपयोग पाठिंबा मिळवण्यासाठी झाला नसल्याचंच दिसून आलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलवण्यात आलं आहे. त्यांना उद्या रात्री ८.३० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

आता ही मुदत देणं नाकारल्यानंतर तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत काँग्रेसशी चर्चा करण्यात येईल आणि आम्ही निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. अशात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यावर आम्ही या सगळ्या घडामोडींवर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.