राज्यात निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरू आहेत. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज (शुक्रवार) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना समजून घेण्यासाठी राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

आपण कोणावर विधान करतोय याचं त्यांनी भान ठेवावं. यावेळी त्यांनी राऊतांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा दिल्या. वयाप्रमाणे त्यांच्या विचारांमध्येही परिपक्वता यावी, असंही ते म्हणाले. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदरापोटी अनेक लोक मातोश्रीवर त्यांना भेटण्यासाठी येत होते. परंतु आता मातोश्रीवरून लोक पंचतारांकीत हॉटेलमध्ये लोकांना भेटायला जातात. यापूर्वी मातोश्रीवरून राज ठाकरेंना कोणी भेटायला जात नव्हते. परंतु आता सत्तालालसेपोटी मातोश्रीवरून लोक बाहेर पडून माणिकराव ठाकरेंनाही भेटायला जातात, असा टोला त्यांनी यावेळी हाणला.

विसंवादासाठी राऊत जबाबदार
वयासोबत परिपक्वता वाढावी असा टोला लगावत शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना वाढदिवसानिमित्त खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. मंदिराची शपथ घेऊन असत्य पसरवणं मान्य नाही, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. शिवसेनेचा मोदींबदला आदर स्वाथी की नि:स्वार्थी असा सवाल यावेळी त्यांनी विचारला.