राज्यात निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. त्यातच सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. १०५ जागांवर विजय मिळवत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशातच आता राज्यातील नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. देवेंद्र फडणवीस हे तर ‘गॉड गिफ्ट’ आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी तेच विराजमान होणार असून महायुतीचच सरकार येईल, असा विश्वास भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

विधानसभेच्या निवडणुका भाजप-शिवसेना एकत्र लढले. त्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीचेच सरकार महाराष्ट्रात येईल. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते यासाठी प्रयत्न करीत आहेत, असं बावनकुळे यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीमध्येच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री कोण ? हा प्रश्नच निर्माण होत नाही. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल. उद्धव ठाकरे जी भूमिका मांडत आहेत ती हीच आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला. युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत संजय राऊत यापूर्वी म्हणाले होते.मतदार वाट बघत आहेत की शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी होईल? असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. आमच्याकडे भाजपाला वगळून पर्याय तयार आहे आणि संख्याबळही तयार आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. भाजपाकाडे संख्याबळ नसल्यामुळेच ते सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.