20 January 2020

News Flash

भाजपचे नेते झोपेतही माझेच नाव चाळवतात

अनेक निर्णय पहिल्यांदा महाराष्ट्राने घेतले आणि नंतर देशपातळीवर घेतले गेले.

मोदी-शहांना शरद पवारांचा टोला

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला दिले. महिलांना राजकीय व्यवस्थेत संधी मिळावी यासाठी आरक्षणाचा, तर ओबीसी समाजालाही राजकीय प्रक्रियेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय घेऊन महाराष्ट्राला सामाजिकदृष्टय़ा समृद्ध करून देशात प्रथम क्रमांकाचे राज्य केले. राज्याने घेतलेले अनेक निर्णय नंतर देशपातळीवर घेतले गेले. असे असताना भाजपचे नेते शरद पवारांनी काय केले, असा प्रश्न विचारत असून माझ्या नावाशिवाय भाषणच पूर्ण होत नाही. रात्रीही भाजपचे नेते माझे नाव चाळवतील, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

केज व परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी अंबाजोगाई येथे सभा झाली. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, केजचे उमेदवार पृथ्वीराज साठे, माजी मंत्री पंडितराव दौंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, संजय दौंड आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले,की भाजपचे नेते राज्यात आमचीच सत्ता येणार असा दावा करत आहेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पक्षाचे सर्व नेते राज्यात का फिरत आहेत? प्रत्येकाचे भाषण शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. बहुधा रात्रीही हे नेते माझ्या नावाने चाळवत असतील, असा टोलाही लगावला. अमित शहा यांनी एका क्रीडासंकुलात बोलताना शरद पवारांनी काय केले, असा प्रश्न विचारला. तेव्हा समोर बसलेल्यांपकी दोघांनी उठून तुम्ही ज्या ठिकाणाहून भाषण करताहेत ते संकुल पवार यांनीच बांधले आहे असे सांगितल्याचा किस्सा पवारांनी ऐकवला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला मताचा अधिकार दिला. त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला त्यांचे नाव दिले. सत्तेची पर्वा न करता हा निर्णय घेतला. तसेच महिलांना सत्तेची संधी मिळावी यासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय पहिल्यांदा महाराष्ट्राने घेतले आणि नंतर देशपातळीवर घेतले गेले. तरीही भाजपचे नेते शरद पवारांनी काय केले, असा प्रश्न विचारतात हे हास्यास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत चौदा निवडणुका लढवून आपण त्या जिंकल्या. या वेळी तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात परिवर्तन होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी ऐनवेळी भाजपात गेल्याबद्दल टीका करत, अक्षय मुंदडा त्यांच्या आई दिवंगत विमल मुंदडा यांच्या वचनाला जागल्या नाहीत, ते सामान्य माणसाच्या वचनाला काय जागतील, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तरी परळी मतदारसंघातून आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. पृथ्वीराज साठे  यांनीही आपण सामान्य कुटुंबातील असून जनतेची प्रामाणिक सेवा करू, असे सांगितले

First Published on October 19, 2019 4:10 am

Web Title: bjp leader ncp sharad pawar akp 94
Next Stories
1 पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उभा करण्याचे राजकारण बंद करा – केजरीवाल
2 बुलढाणा जिल्हय़ातील तुल्यबळ लढतीत जातीय समीकरणे महत्त्वाची
3 राजकीय घराण्यांचे वारसदारच उमेदवार
Just Now!
X