माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्यामुळेच संजय राऊत आडवे झाले असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांना काहीही झालेलं नाही. शिवसैनिक फटकावतील आणि अति हुशारी दाखवून तोंडावर आपटले म्हणून ते मुद्दाम आडवे झाले आहेत. ते स्वत: चालत हॉस्पीटलमध्ये गेले आणि काही तासातच सगळी ऑपरेशनही करून झाली. लोकं मूर्ख नाहीत, अशा आशयाचं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळले होते. दुपारनंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. गेल्या १५ ते १८ दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. यापूर्वीही निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती.
संज्याला काही झालेलं नाही. शिवसैनिक फटकवतील आणि अती हुशारी दाखऊन तोंडावर आपटला म्हणून मुद्दामून आडवा झालाय. स्वतः चालत गेलाय हॉस्पिटल मध्ये आणि काही तासातच सगळी ऑपरेशन पण करून झाली ह्याच्यावर. लोकं मूर्ख नाही संज्या… https://t.co/mKVfMnM1EU
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 12, 2019
शिवसेना नेते संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कोणातरी टीव्ही आणि लाईटच्या बिलाचे पैसे द्या असं राणे यांनी म्हटलं आहेत. तर याच ट्विटमध्ये त्यांनी उद्धव यांना खोटारडा म्हटल्याने इतकं वाईट वाटलं आहे की त्यांना कॅडबरी देऊन शांत करायला हवं असं मत नोंदवलं आहे. “संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या आणि उध्दव ला कॅडबरी चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून,” असं राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 1:02 pm