27 February 2021

News Flash

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?; भाजपाला बसणार हादरा

पंकजा मुंडेंच्या निर्णयाकडे लक्ष

राज्यात सत्ता स्थापनेचा प्रयत्न फोल ठरल्यानंतर भाजपामध्ये हादरा होण्याची कंपने जाणवू लागली आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्यानं स्वपक्षीयांवर टीका करत आहेत. त्यात आता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून तसे मार्ग बदलण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी ट्विटर बायोही बदलला आहे. गेल्या काही दिवसांत पंकजा यांनी शिवसेनेचे कौतूक करणारे ट्विट केले आहेत. त्यामुळे पंकजा शिवसेनेत जाणार का? अशी शंकेची पाल राजकीय वर्तुळात चुकचुकली आहे.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकावर बसावं लागलं. त्यापूर्वी भाजपानं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीनं भाजपान सरकार स्थापन केलं. पण, ते अल्पायुषी ठरलं. बहुमत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार चार दिवसात कोसळलं. त्यामुळे राज्यातील नेतृत्वाविषयी असलेली भाजपातील खदखद बाहेर येऊ लागली आहे. भाजपाचे नेते एकनाथ खडसे सातत्यानं याविषयी पक्षाला खडेबोल सुनावत आहेत.

त्यात भाजपाच्या महिला नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली. “आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…
आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे,” असं पंकजा यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटर हॅण्डलवरील आपला ‘बायो’ही बदलला आहे. त्यांच्या बायोतून भाजपाचा उल्लेख काढण्यात आलेला असून, २८ नोव्हेंबरला पंकजा यांनी शेवटचे ट्विट केले आहे. दिवसभरात त्यांनी केलेले ट्विट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे कौतूक करणारे आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवडही झाली. मात्र, पंकजा मुंडे यांनी त्याबद्दल कोणतही ट्विट केलेलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेविषयी केलेल्या ट्विटवरून तर्कविर्तक लावण्यास सुरूवात झाली आहे.

मागील तीन टि्वटमध्ये त्यांनी नेमके काय म्हटले ?

पहिले टि्वट ः बाळासाहेबांच्या स्वप्नांना व मराठी माणसाला असलेल्या अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे न्याल व पदा सोबत आलेल्या सत्ता व संघर्ष याचा योग्य मेळ कराल ही ईश्वर चरणी प्रार्थना !! @ShivSena  @OfficeofUT @AUThackeray

दुसरे टि्वट ः आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!’

तिसरे टि्वट ः  आदरणीय बाळासाहेबांच्या स्वप्नांना व मराठी माणसाला असलेल्या अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना !! @ShivSena @OfficeofUT

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 12:28 pm

Web Title: bjp leader pankaja munde may quit party she will be join shiv sena bmh 90
Next Stories
1 ‘केंद्राकडे भीक का मागताय?’; निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल
2 ही महाराष्ट्राशी गद्दारी; हेगडेंच्या विधानावर संजय राऊत संतापले
3 Video : “फडणवीसांच्या नशिबी काय हे सटवीलाच माहित”
Just Now!
X