तीन जागांवर बंडखोर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्य़ात शिवसेना-भाजप युतीला अतिशय अनुकूल वातावरण असले तरी सेनेच्या वाटय़ाला आलेल्या पाचपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांपुढे अडचण निर्माण झाली आहे.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश यांच्या विरोधात खेड मतदारसंघात भाजपचे केदार साठे यांनी अर्ज भरला. शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या मुश्ताक मिरकर यांनी अर्ज दाखल करत राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यापुढे आव्हान उभे केले.  मिरकर राष्ट्रवादीसाठी डोईजड ठरू शकतात. दापोली नगरपंचायतीतील शिवसेना आणि काँग्रेसमधील नवा मैत्री करार पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि काँग्रेसनेते भाई जगताप यांच्या मुत्सद्देगिरीमुळेच झाला आहे. जगताप यांचे मिरकर हे जवळचे कार्यकर्ते असल्यामुळे ही दोस्ती विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवरही कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, कुणबी समाज संघटनेच्या अधिकृत उमेदवार सुवर्णा पाटील यांनीही या मतदारसंघातून अर्ज दाखल केला. मागील निवडणुकीत समाजाच्या उमेदवारासोबत राहिलेल्या मतांचे ध्रुवीकरण करण्याची त्यांची भूमिका असली तरी त्यांचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत केळशी आणि देव्हारे विभागात समाजाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही मते यंदा शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या पारडय़ात जाण्याची शक्यता होती. ती रोखण्यासाठी पाटील यांचा पर्याय दिला गेला असल्याची चर्चा आहे.

गुहागरमधून शिवसेनेने राष्ट्रवादीतून अलीकडेच दाखल झालेल्या भास्कर जाधव यांना उमेदवारी दिली असतानाच त्यांचे एके काळचे निकटवर्तीय रामदास राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने शुक्रवारी अर्ज दाखल केला. एके काळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचेही कार्यकर्ते जाधव यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत.

चिपळूण मतदारसंघातही अशाच प्रकारे भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीतून भाजपचे तुषार खेतल यांनी अर्ज भरला आहे.