राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या प्राचाराने जोर पडकला असून जवळजवळ सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी आता मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी प्रचारफेऱ्या, सभा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. असाच एक कार्यक्रम भाजपाने औरंबादामध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमामधील भाषणे आणि वक्तव्यांपेक्षा हा कार्यक्रम चर्चेत आला आहे तो कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या भाजपाच्या नेत्यांच्या एका कृत्यामुळे. या कर्याक्रमाला उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातील करण्यात येणारे दीप प्रज्वलन चक्क सिगारेटच्या लायटरने केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबादमधील ‘भगवान कॉलेज ऑफ फार्मसी’मध्ये भाजपाच्या वतीने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉफी विथ युवा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातील दीप प्रज्वलन करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना वेळेत मेणबत्ती आणि मचीस न मिळाल्याने त्यांनी चक्क सिगारेटच्या लायटरने दिवा पेटवला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन झवेरी, उपमहापौर विजय औताडे, प्रवणी घुगे हे नेते उपस्थित होते. दीप प्रज्वलनासाठी सर्व मान्यवर समईजवळ आले त्यावेळी मेणबत्ती आणि माचीस शोधण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करु लागले. काही क्षण गेले तरी कोणीच माचीस अथवा मेणबत्ती न दिल्याने शहराध्यक्ष तनवाणी यांनी खिशातून सिगारेट पेटवण्याचा लायटर बाहेर काढून पुढे होऊन समई प्रज्वलित केली. तनवाणी यांच्या या पवित्र्यामुळे मंचावरील नेतेही गोंधळले. ‘हे काय?’ असा सवाल सभापती केणेकर यांनी तनवाणी यांच्याकडे पाहत केला. मात्र तोपर्यंत तणवाणी यांनी लायटर राज्यमंत्री सावे यांच्या हातात दिला. सावेंनी लायटरने दीप प्रज्वलन करण्यास नकार दिला. मात्र प्रदेश उपाध्यक्ष कराड यांनी पुढे होत लायटरनेच समईतील दुसरी वात पेटवली.

भाजपाच्या नेत्यांनाची मंचावर चक्क लायटरने दीप प्रज्वलन केल्याने उपस्थितांनाही आश्चर्य वाटले. अनेक तरुण विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा आगळावेगळा दीप प्रज्वलन सोहळा पाहून हसू अनावर झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders used cigarette lighter to lighting a diya scsg
First published on: 02-10-2019 at 10:32 IST