नागपूर : भाजपने विधानसभा निवडणुकीत जनमताचा कौल डावलून उमेदवारी दिल्याने नागपुरातील दोन विदर्भातील प्रमुख पाच जागा गमवल्या आहेत.

भाजपने उमेदवारी वाटप करताना आपल्या गटातील उमेदवारांना कशा अधिक जागा मिळतील, यावर भर दिला. त्यामुळे दक्षिण नागपुरात विद्यमान आमदाराची उमेदवारी नाकारण्यात आली. येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. परंतु तो निसटता विजय आहे. अतिशय अटीतटीची लढत येथे झाली. जेव्हा येथे लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले मताधिक्य होते. अशीच स्थिती मध्य नागपुरात दिसून आली. विद्यमान आमदाराविरोधात नाराजी असतानाही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. यामुळे नवखे उमेदवार बंटी शेळके यांनी येथे जोरदार टक्कर दिली आणि विकास कुंभारे अक्षरक्ष: हरता-हरता जिंकले. उमेदवारी जाहीर करताना जनमत कौल उमेदवाराच्या बाजूने नसल्याचे दिसत होते. तरीही उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी भाजपचे पक्षांतर्गत राजकारण कारणीभूत ठरले. त्याचा फटका पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूरमध्ये भाजपला बसला. या दोन्ही मतदारसंघातील आमदारांविषयी कमालीची नाराजी होती. मात्र, पक्षाने त्यांनाच संधी दिली आणि परिणाम समोर आहे. भाजपने दोन्ही जागा गमावल्या आहेत. चंद्रपूरमध्येही विद्यमान आमदरांविरोधात नाराजी होती. निष्क्रिय आमदार असल्याचे पक्षाचे कार्यकर्ते सांगत होते. मात्र, पुन्हा पक्षांतर्गत राजकारण आडवे आले आणि श्यामकुळे यांनी उमेदवारी देण्यात आली. येथे भाजप हरली आणि अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. भंडारा जिल्ह्य़ात तर भाजपचा धुव्वा उडाला तर गोंदिया जिल्ह्य़ात एक जागा राखून लाज राखली गेली. या जिल्ह्य़ातील पालकमंत्री बदलण्यात आले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी परिणय फुके यांना पालकमंत्री करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक जिल्ह्य़ात लढवण्यात आली. येथे खुद्द पंतप्रधानांनी जाहीर सभा घेतली. मात्र, भाजप येथे जनमताचा कौल जाणून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. भंडारा येथे अपक्ष उमेदवाराने बाजी मारली, तर साकोलीत पालकमंत्री परिणय फुके यांना नाना पटोले यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. तुमसरमध्ये विद्यमान आमदाराची उमदेवारी कापण्यात आली आणि भाजपने जागा गमावली. गोंदिया जिल्ह्य़ातील अशीच अवस्था भाजपची झाली. अमरावती जिल्ह्य़ात कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. पण, त्याकडे सत्ताधारी भाजपचे लक्ष गेले नाही.

यामुळे स्वाभिमान शेतकरी पक्षाच्या एका कार्यकर्त्यांने बोंडे यांना धूळ चारली, तर मुख्यमंत्र्याच्या गृहजिल्ह्य़ातील कामठी या एकतर्फी लढत असलेल्या जागेसाठीही अखेर क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्याचा कामठीसह विदर्भात परिणाम जाणवला.