News Flash

हे तर ‘आयत्या बिळावर नागोबा’; भाजपाची अशोक चव्हाणांवर टीका

'रम्याचे डोस'च्या माध्यमातून भाजपाने विरोधकांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

रम्याचे डोस

मराठीमध्ये अनेक म्हणी प्रचलित आहेत. त्यापैकी अशाही काही म्हणी आहेत ज्या आपण रोजच्या जीवनातही वापरत असतो. शाळांमध्येदेखील आपल्याला प्रचलित म्हणींची उजळणी करून घेतली जाते. ‘आयत्या बिळावर नागोबा’ या म्हणीचं राजकीय उदाहरण देत भाजपाच्या रम्या पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका करताना दिसत आहे. भाजपा महाराष्ट्रने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. यामध्ये एक मुलगी रम्याला ‘आयत्या बिळावर नागोबा’ या म्हणीला साजेसं असं उदाहरण विचारताना दिसत आहे.

एक शाळेत शिकणारी मुलगी रम्याला ‘आयत्या बिळावर नागोबा’ या म्हणीला साजेसं उदाहरण सुचवण्यास सांगते. त्यावर रम्या तिला आपलं जुनं सरकार अभ्यासातही उपयोगी पडेल असं मी तुला सांगितलं होतं ना असं सांगतो आणि त्याचं तो उदाहरण देतो. आपल्या जुन्या मुख्यमंत्र्यांनी जवानांच्या कुटुंबीयांसाठीची घरे आपल्या नातेवाईकांना दिली.हाय की नई… ‘आदर्श’ बिळावर… सॉरी आयत्या बिळावर नागोबा! असं तिला उत्तर देतो.

आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नोव्हेंबर २०१० मध्ये अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तत्कालीन काँग्रेस सरकारला यावरून मोठी नामुष्की सहन करावी लागली होती. चव्हाण यांनी आदर्श सोसायटीला अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर करून तेथील दोन फ्लॅट कुटुंबीयांसाठी घेतले. तसेच ही सोसायटी कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बांधली जात असताना तेथील ४० फ्लॅट सर्वसामान्य नागरिकांना देण्यासही महसूलमंत्री असताना त्यांनी परवानगी दिली, असा आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी सीबीआयला परवानगी नाकारली होती. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्याने चव्हाण यांचे नाव या प्रकरणातून वगळण्याची विनंती सीबीआयने केली होती. मात्र, त्याविषयीचा सीबीआयचा अर्ज आधी सीबीआय न्यायालयाने आणि नंतर उच्च न्यायालयानेही फेटाळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 1:11 pm

Web Title: bjp maharashtra ramyache dose criticize former cm and congress leader ashok chavan adarsh scam jud 87
Next Stories
1 सोलापूर : बार्शीजवळ भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; बसचा चेंदामेंदा
2 घटनाक्रम: शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात आल्यापासून काय काय घडलं
3 कुटुंबाला वाचविले; पण कर्ता वाहून गेला
Just Now!
X