महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच प्रचार सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी कोणताही पक्ष सोडत नाहीये. सोशल मीडियावरील हे वॉर काही नवं नाही. सध्या सोशल मीडियावर भाजपा जास्त अॅक्टीव्ह असल्याचं पहायला मिळतं. यापूर्वी ‘रम्याचे डोस’ या मालिकेच्या माध्यमातून रम्या हे नवं पात्र तयार करून भाजपाने विरोधकांवर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली आहे. तर आता व्यंगचित्रांच्या माध्यमातूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाजपाने आपल्या ट्विटरवरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. यामध्ये राज ठाकरे हे विनोदी पक्ष नेते असल्याचं म्हटलं आहे.

भाजपाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरील एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. यामध्ये २०१४ आणि २०१९ मध्ये राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी आपल्या हाती एकहाती सत्ता देण्याची मागणी मतदारांकडे केली होती हे या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. तर व्यंगचित्राच्या दुसऱ्या बाजूला राज ठाकरे २०१९ मध्ये आपल्या हाती विरोधीपक्षाची धुरा देण्याची मागणी केली. यावर मतदार त्यांना ‘तुम्ही कसले विरोधीपक्ष नेता… तुम्ही तर विनोदी पक्ष नेता’ असं म्हणताना दाखवण्यात आलं आहे.

माझ्या हाती विरोधी पक्षाची धुरा द्या अशी जाहीर मागणी त्यांनी सांताक्रूझ या ठिकाणी झालेल्या सभेत केली. राज्यात एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. जर विरोधी पक्ष सक्षम असेल तर तो जनतेचे प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे मांडू शकतो. माझा आवाका मला ठाऊक आहे त्यामुळे मला सक्षम विरोधी पक्ष बनवा अशी मागणी राज ठाकरेंनी केली. इतकंच नाही तर जेव्हा सत्ता मागायची वेळ येईल तेव्हा मी सत्ताही मागेन असंही ते म्हणाले.