अमरावती : भाजप-शिवसेनेत सत्तावाटपासाठी वाटाघाटी सुरू असताना नियोजित मंत्रिमंडळात पश्चिम विदर्भातील किती जणांना स्थान मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम विदर्भातील ३० पैकी १५ जागांवर भाजपने यश मिळवले आहे. दुसरीकडे, शिवसेनेला चार जागा मिळाल्या असल्या, तरी प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्यांचेही संख्याबळ वाढले आहे.

अमरावती जिल्ह्यातील एकमेव मंत्री डॉ. अनिल बोंडे हे पराभूत झाल्याने, आता जिल्ह्यात त्यांच्याजागी कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असतानाच अचानक प्रहारचे आमदार बच्चू कडू हे शिवसेनेच्या कोटय़ातून मंत्री होऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेचे संजय राठोड, भाजपचे मदन येरावार आणि डॉ. अशोक उईके यांनी मंत्रिपद भूषवले असून तिघेही पुन्हा निवडून आले आहेत. आता या तिघांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. त्यामुळे ज्येष्ठ असलेल्या मदन येरावार यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली होती. शिवसेनेचे संजय राठोड हे कॅबिनेट मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असताना विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांना संधी देण्यात आली. त्यामुळे संजय राठोड यांचे समर्थकही निराश झाले होते. यावेळी हे तिघेही जण पुन्हा निवडून आले आहेत.

संजय राठोड तर तब्बल ६३ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दावा प्रबळ मानला जात आहे. डॉ. अशोक उईके, मदन येरावार आणि संजय राठोड यांच्या समर्थकांमध्ये उत्साह आहे. मंत्रिपद मिळेलच, असा विश्वास ते व्यक्त करीत असले, तरी कॅबिनेट मंत्रिपद आणि तेही प्रमुख मिळाले पाहिजे, अशी आशा त्यांना आहे.

दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील डॉ. संजय कुटे यांची पुन्हा मंत्रिपदी निवड होऊ शकते, असा कयास व्यक्त केला जात आहे. भाजपने अखेरच्या विस्तारात डॉ. संजय कुटे यांना थेट कॅबिनेट मंत्री करून बुलढाणा जिल्ह्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. डॉ. संजय कुटे यांना मंत्रिपदाचा चार महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला; मात्र या काळात त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली. यावेळी त्यांना चांगल्या खात्यासह मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा आहे.

अकोल्यातील ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा व प्रकाश भारसाकळे हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार समजले जातात. गेल्यावेळी त्यांना डावलून विधान परिषद सदस्य डॉ. रणजीत पाटील यांना मंत्रिपद मिळाले होते. गोवर्धन शर्मा यांनी यापूर्वी राज्यमंत्रीपद भूषवले आहे, तर प्रकाश भारसाकळे हे सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. वाशीममधून भाजपचे राजेंद्र पाटणी यांचे नाव गतवेळीही शर्यतीत होते. ते पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनाही यावेळी वाशीमला मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे.

यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशीम या चार जिल्ह्यांत भाजप-शिवसेना महायुतीला दमदार यश मिळालेले असताना अमरावतीत मात्र हादरा बसला, त्यामुळे या जिल्ह्यात मंत्रिपद मिळेल की नाही, याची उत्सुकता ताणली गेली आहे.