राज्याच्या निवडणुकांचे निकाल लागले असून आता सत्ता स्थापनेकडे आणि मुख्यमंत्रिपदाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच १०५ जागांवर विजय मिळवून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यातच भाजपाचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेच्या ५६ पैकी ४५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काकडे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एकीकडे शिवसेना भाजपाकडून सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आपल्याला देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. परंतु संजय काकडे यांनी केलेल्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील खळबळजनक दावा केला आहे. भाजपाचे ५० आमदार आमच्या संपर्कात असून ते आपल्याला शिवसेनेत घेण्याची मागणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता यावर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रत्येक पक्षात नेत्यांना मानणारा वर्ग असतो. तसाच एक वर्ग शिवसेनेतही आहे. सध्याच्या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी या ४६ आमदारांनी केली आहे. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असू द्या. आपण सर्वांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. १९९५ मध्ये शिवसेनेला अधिक जागा होत्या. त्यावेळी मनोहर जोशी हे साडेचार वर्ष मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे हे साडेचार वर्ष उपमुख्यमंत्री होती, तसाच फॉर्म्युला कायम राहिल. गेली पाच वर्ष आम्ही जसं सरकार चालवलं तसंच यापुढेही चालवावं, अशी त्या आमदारांच्या मनात इच्छा असल्याचे काकडे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाटपाच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यातच पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही ते म्हणाले. भाजपाच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन होईल असंही स्पष्ट करत अगदीच आडमुठी घेणार नाही. काही मागण्या मेरिटवर तपासून पाहू असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते हे पहावं लागणार आहे.