स. प. महाविद्यालय, भाजपकडून प्रत्येकी १५ लाखांच्या दंडाची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेसाठी सर परशुराम महाविद्यालयाच्या आवारातील झाडे तोडल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल करण्यात आली आहे. महाविद्यालय प्रशासन, भारतीय जनता पक्ष, महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण समिती यांच्याविरोधात ही याचिका आहे.

मोदी यांनी १७ ऑक्टोबरला स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली. या सभेसाठी मैदानावर मांडव उभारला जात असताना झालेल्या वृक्षतोडीबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे एका दिवसात अर्ज, पाहणी आणि तत्परतेने वृक्षतोड झाल्याने महापालिकेच्या कारभारावरही जोरदार टीका झाली. त्यानंतर याबाबत विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मदन खुरे आणि बोधी रामटेके यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. परिक्रमा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल केली आहे.

वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, महाविद्यालय, भाजप, वृक्ष प्राधिकरण समिती आदी प्रतिवाद्यांनी लेखी माफी मागून भविष्यात असा प्रकार करणार नसल्याची ग्वाही द्यावी. कोणत्याही सभा किंवा रॅलीसाठी कायदेशीर बाबींची पूर्तता न करता वृक्षतोड करता येणार नसल्याचे न्यायाधिकरणाने आदेश द्यावेत. महाविद्यालय आणि भाजपला या प्रकरणात प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड करावा. ही रक्कम वृक्ष प्राधिकरण समितीकडे ठेवून त्याचा वापर शहरातील वृक्ष संवर्धनासाठी करावा, या मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या अंतर्गत संबंधित वृक्ष लावले होते. ते पोलीस संरक्षणात तोडण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी या वृक्षांची निगा राखत होते. नियमांचे उल्लंघन करून ते तोडण्यात आल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.