भाजपा पक्षात असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही कोणाचे तळवे चाटले नाहीत ना कोणाची लाचारी पत्करली असा टोला आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मातोश्रीमध्ये बसून आदेश देणं सोपं असतं, पण काम करणं कठीण असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

“ज्या पक्षाच्या आमदारकीची शपथ घेतली त्या पक्षाने सत्तेसाठी कोणाची लाचारी केली नाही याचा अभिमान आहे. समर्थन नव्हतं तेव्हा फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. आम्हाला पंचतारांकित हॉटेलांची गरज लागली नाही. कोणाचेच तळवे चाटले नाहीत किंवा कोणाची लाचारी पत्करली नाही,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांनी यावेळी आदित्य ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासंबंधी प्रश्न विचारलं असता नितेश राणे यांनी सांगितलं की, “मातोश्रीत बसून आदेश सोपं असतं. पण विधीमंडळात प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. आमच्यासारखी लोक मैदानात तयार आहेत. आम्ही महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊन हे हक्कानं सांगतो”. महाराष्ट्राच्या हक्कासाठी, न्याय मिळवण्यासाठी आम्हाला विधीमंडळात पाठवलं आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत गेल्यासंबंधी विचारलं असता नितेश राणे यांनी पवार कुटुंब एकत्र आल्याचं समाधान व्यक्त केलं. कोणतंही कुटुंब तुटता कामा नये असं यावेळी त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- हे दरोडेखोर आता उघडपणे दरोडा टाकणार; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. महाविकास आघाडीने मंगळवारी राज्यपालांकडे १६६ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. राज्यपालांनी आघाडीला ३ डिसेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यास सांगितले आहे.