विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त प्रचारसभा आज मुंबईत होत असून त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. दरम्यान यावेळी मुंबईत काही दिवसांपुर्वी वादग्रस्त ठरलेल्या आरेच्या मुद्यावर बोलू नका असा संदेश भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आला असल्याची सुत्रांची माहिती आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेमधील झाडे कापण्यात आली असून भाजपा आणि शिवसेनेची भूमिका अगदी एकमेकांविरोधात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उघडपणे झाडं कापण्याला विरोध केला असून, उद्धव ठाकरे यांनी आपण सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल जाहीर करु असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये अडचण निर्माण करु शकणाऱ्या या मुद्याचा उल्लेख महायुतीच्या सभेत आणि त्यातही नरेंद्र मोदी मंचावर असताना होऊ नये यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे.

विधानसभा निवडणुकीत जागावाटपात भाजप १६४ तर शिवसेना १२४ जागा अशारितीने युती झाली. विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत मोठा भाऊ असणारी शिवसेना आता धाकटय़ा भावाच्या भूमिकेत आली. महायुतीला २२० जागा मिळवण्याचे लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. त्यामुळेच निवडणूक प्रचार काळात एकत्र न फिरता स्वतंत्रपणे फिरून जास्तीत जास्त मतदारसंघात पोहोचण्याची रणनीती ठरवण्यात आली. केवळ युतीचेच नाही तर भाजपचे नेतेही वेगवेगळे फिरून अधिकाधिक मतदारसंघात पोहोचत आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावमधील पहिली सभा सोडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी यांच्या सभेत दिसत नाहीत. त्यावेळेत ते इतर दोन मतदारसंघात सभा घेतात. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून त्याआधी शिरस्त्याप्रमाणे भाजप-शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांची मुंबईत सभा होत आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शुक्रवारी सायंकाळी होणार आहे.

आणखी वाचा : शिवडीमध्ये पुन्हा भगवा फडकणार? अजय चौधरींच्या विजयाची शक्यता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहतील. महायुतीचे अनेक बंडखोर एकमेकांविरोधात उभे आहेत. या पार्श्वभुमीवर युतीच्या सर्वोच्च नेत्यांच्या या पहिल्या व शेवटच्या संयुक्त प्रचार सभेत काय संदेश देतात याबाबत उत्सुकता आहे