विधानसभा निवडणुकांची तारीख आणि निकालाची तारीख आजच जाहीर करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच भाजपाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटा काढला आहे. राज ठाकरेंचा उल्लेख या व्यंगचित्रात चक्क ‘सोंगटी’ असा करण्यात आला आहे. ‘राज’मान्य खेळ असा मथळा या व्यंगचित्रात देण्यात आला आहे.
काय आहे व्यंगचित्रात?
राज ठाकरेंबाबतच्या या व्यंगचित्रात राज ठाकरे ठिक्कर या खेळाच्या मधोमध उभे आहे असे दाखवण्यात आले आहे. २००४ च्या चौकटीत शिवसेना, २००९ च्या चौकटीत मनसे दाखवण्यात आली आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या दोन चौकटी दाखवण्यात आल्या. त्यामध्ये राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या चौकटीत उभे राहिले आहेत असे दाखवण्यात आले आहे. त्यापुढे २०१९ ची विधानसभा निवडणुकीची चौकट आहे त्यामध्ये प्रश्नचिन्ह दाखवण्यात आले असून राज ठाकरेंना सोंगटी असे संबोधण्यात आले आहे. ‘आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार?’ असा प्रश्न विचारुन भाजपाने राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार??
शेवटी जनतेच्या मनोरंजनाचा प्रश्न आहे…!! pic.twitter.com/w3jg22M7Uv
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 21, 2019
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात प्रचार केला. त्यांनी लोकसभेची एकही जागा लढवली नाही. मात्र प्रचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने केला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी १० सभा घेतल्या. या दहा सभांमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे त्यांचे वाक्यही चांगलेच गाजले. त्यानंतर लोकसभा निवडणूक निकाल लागल्यावर राज ठाकरे यांनी अनाकलनीय अशी एका शब्दाची प्रतिक्रिया दिली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे काय करणार हे स्पष्ट झालेले नाही. आता विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकालाची तारीख जाहीर होताच भाजपाने मनसेची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता या व्यंगचित्राला राज ठाकरे काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजेच आघाडीसोबत राज ठाकरे जातील असा कयास लावला जात होता. मात्र मनसेला सोबत घ्यायचं नाही ही भूमिका काँग्रेसने घेतली त्यामुळे मनसेला सोबत घेता आलं नाही हे शरद पवार यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले. आता निवडणूक जाहीर होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले आहे आणि त्यात राज ठाकरेंची खिल्ली उडवण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2019 2:46 pm