‘बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है’ असं म्हणत भाजपाच्या ‘रम्या’ने बारामतीच्या साहेबांना डोस दिले आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपाचा रम्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने आता थेट बारामतीच्या साहेबांनाच डोस दिले आहेत. ‘ तुरुंगात न गेल्याचं बिरुद मिरवणाऱ्यांना रम्या म्हणतो बहुत कुछ लाईफमें फर्स्ट टाईम होता है ‘ असा मथळा देऊन एक संवाद दाखवण्यात आला आहे. या व्यंगचित्रात रम्याला एकजण म्हणतो, रम्या साहेब म्हणतात मी अनेक बरी-वाईट कामं केली. पण तुरुंगात कधी गेलो नाही. त्यावर लगेच रम्या म्हणतो, ते जाऊदे रे! मुन्नाभाईचा डायलॉग बघ ना… म्हणतोय बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाइम होता है रे..

#बारामतीकरामती आणि @NcpSpeaks ला यामध्ये टॅग करण्यात आलं आहे. त्यावरुन हा टोला शरद पवार यांना आहे हे उघड आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मंगळवारी संध्याकाळी शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर ही कारवाई राज्य सरकाने निवडणुकीच्या तोंडावर सूड भावनेने केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसंच शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली आणि शुक्रवारी आपण ईडी कार्यालयात पाहुणचार घेण्यासाठी जात आहोत असाही टोला लगावला.

या सगळ्या घडामोडींच्या तिसऱ्या दिवशी भाजपाच्या रम्याने बारामतीच्या साहेबांना मुन्नाभाईचं तत्त्वज्ञान समजावून सांगितलं आहे. त्यामुळे भाजपाच्या रम्याने मारलेला हा टोला कुणाला आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. दरम्यान जी कारवाई ईडीने केली आहे त्याचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारीच सांगितलं आहे. इतकंच नाही तर महायुतीचं सरकार येणार आहे याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे आम्ही सूडभावनेने कारवाई कशाला करु असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. आता शिखर बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रम्याने मात्र बारामतीच्या साहेबांवर टीका केली आहे. या व्यंगचित्रात कुठेही शरद पवार यांचे नाव घेण्यात आलेले नाही. मात्र साहेब म्हणतात आणि बारामतीच्या करामती यावरुन या व्यंगचित्राचा रोख कुणाच्या दिशेने आहे ते महाराष्ट्र जाणतोच. त्यामुळे आता या भाजपाच्या रम्याने दिलेल्या सल्ल्यावर राष्ट्रवादी काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.