सत्तापेचात नवी खेळी : ‘मातोश्री’कडे प्रस्ताव सादर

नवी दिल्ली/मुंबई : शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते, असे भाजपने सत्तासंघर्षांत वारंवार स्पष्ट केले असले तरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार सत्तेत येणार हे निश्चित झाल्यावर भाजपने सुरुवातीची अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री पद देऊ करण्याची नवी खेळी गुरुवारी केली. यासंदर्भात भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘मातोश्री’ला प्रस्ताव सादर केला, शिवसेनेकडून उत्तराची भाजपला अपेक्षा आहे.

सत्तेच्या समान वाटपावरून भाजप आणि शिवसेनेचे गणित बिघडले. युतीच्या चर्चेत अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा निर्णय झाला होता, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता, पण भाजपने हा दावा फेटाळून लावला. असा कोणताही निर्णयच झाला नव्हता, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यापासून ठाकरे यांनी भाजपशी चर्चा करण्याचे टाळले होते. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केल्यावर फडणवीस यांनी शिवसेनेच्या आडमुठय़ा भूमिकेमुळेच सरकार स्थापन झाले नाही, असे खापर फोडले होते. तर फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी आपल्याला खोटे पाडल्यानेच चर्चेची दारे बंद केल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतीही चर्चाच झाली नव्हती, असे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सांगितले होते. यातून पुढे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, असे भाजपचे गणित होते. पण भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत येणार, असे चित्र समोर आले.

या पार्श्वभूमीवर भाजपने नवी खेळी केली. शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. या संदर्भात भाजपच्या दिल्लीतील एका बडय़ा नेत्याने ‘मातोश्री’शी संपर्क साधला. पण शिवसेनेकडून रात्री उशिरापर्यंत काही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा आता पुढे गेली असून, सारे सूत्रही निश्चित झाले. अशा परिस्थितीत शिवसेनेला माघार घेणे शक्य नसल्याचे समजते.