भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची सर्वपक्षीयांशी असलेली बांधीलकी ही सर्वांच्याच परिचयाची आहे. त्यातच भाजपाच्या नेत्यांशी त्यांचे असलेले घरोब्याचं संबंध विसरता येण्यासारखे नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे प्रमोद महाजन यांची आठवण सांगताना भावूक झाले.

ज्यावेळी मला विधानसभेतून निलंबित करण्यात आलं होतं त्यावेळी प्रमोद महाजन म्हणाले होते, नाथाभाऊंचा आवाज सर्वांना आवडतो. विधानसभेनं एकनाथ खडसे यांना निलंबित केलं म्हणजे ” कुंकुवा विना सुवासिनीची कल्पना सहन करता येत नाही ” तसेच नाथाभाऊ विना विधानसभा ही कल्पना मला सहन होत नाही. एकनाथ खडसे यांना भाजपाकडून उमेदवारी नाकारण्यात आली. त्याची कुठेतरी खंत त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

दरम्यान, यापूर्वी एकनाथ खडसे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला विरोधीपक्ष नेतेपदाची ऑफर देण्यात आली होती. तसंच त्यांनी आपल्यासाठी एबी फॉर्मदेखील आणला होता, असं खडसे यांनी नमूद केलं. “गेल्या काही वर्षांमध्ये माझ्यावर अन्याय झाला. परंतु आपला जन्म चांगल्या संस्कृतीत झाला. जनतेची साथ मिळत आहे, तोवर मी उभा राहिन. भाजपाने मला राज्यात ओळख मिळवून दिली असून त्यांच्यामुळेच मी ६ वेळा आमदार, विरोधीपक्ष नेता, गटनेतेपद आणि १२ खात्यांचं मंत्रीपदही मिळालं. अशा पक्षाला मी मधून सोडणं योग्य नाही,” असं खडसे म्हणाले. “संजय सावकारे हे गेल्या पाच वर्षांपासून सोबत आहेत. त्यांना उमेदवारी निश्चित होती. उमेदवारी रद्द होईल या भितीने काही जवळचे आमदार दूर गेले,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

“आपल्याला उमेदवारी मिळणार नाही यांची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच देण्यात आली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चादेखील झाली होती. मला राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु राज्यपाल बनून गप्प बसत जनतेला वाऱ्यावर सोडायचे का?,” असा सवाल खडसे यांनी यावेळी केला.