अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावरुन झालेल्या मतभेदानंतर शिवेसना आणि भाजपाची युती तुटली आणि राज्यात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपाने सत्तेचं समसमान वाटप होईल असा शब्द दिला होता, ज्यामध्ये मुख्यमंत्रीपददेखील होतं असा दावा करत असताना भाजपाने मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. भाजपाने आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आता शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हेच आधीपासून ठरलं असल्याचा दावा केला आहे.

भाजपाने दिग्रस मतदारसंघातील सेनेचे आमदार संजय राठोड यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानचा आहे. व्हिडीओत संजय राठोड फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं सांगताना दिसत आहेत. भाजपाने व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपद मागणाऱ्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

व्हिडीओत संजय राठोड बोलत आहेत की, “मी अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. एवढा तणाव असताना मुख्यंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधीच चिंता दिसत नाही. शांतपणे प्रशासनावर नियंत्रण ठेवून, हसत मुखत प्रत्येक समस्येवर मार्ग काढला. म्हणूनच माझ्या आणि जनतेच्या मनात अजिबात शंका नाही की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार आहेत”.

युतीला पुन्हा सत्ता मिळाली तर मंत्री पदांमध्ये निम्मा निम्मा वाटा आणि अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद अशी मागणी शिवसेनेने केली होती. निवडणुकीपूर्वी शाह आणि फडणवीस यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. गेल्या आठवडय़ात फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उद्धव यांचे आरोप फेटाळले होते. आपण उद्धव यांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते. शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याची चर्चा झाली असेल, आपल्याला माहीत नाही, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव यांच्या आरोपांचे ओझे शाह यांच्या खांद्यावर टाकले होते. त्याबाबत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना बुधवारी उत्तर दिले.