भाजपला १६, सेनेला १४ जागा, काँग्रेसच्या संख्याबळात एकने घट,  राष्ट्रवादीलाही एक जागा

संतोष प्रधान, मुंबई</strong>

मुंबईच्या मतदारांनी पुन्हा भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला आहे. मुंबईकर एका पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देतात, असा अनुभव आहे. मुंबईत जास्त जागा मिळणारा पक्ष राज्याच्या सत्तेत येतो, असाही इतिहास आहे. १९९५ मध्ये राज्यात युतीला सत्ता मिळाली तेव्हा युतीचे ३० आमदार निवडून आले होते. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्ता मिळाली तेव्हा मुंबईकरांनी आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. याआधी राज्यात काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतून काँग्रेसचे संख्याबळ जास्त असायचे. या वेळी राज्यात बहुमत मिळालेल्या युतीच्या बाजूने मुंबईकर उभे राहिले.

गेल्या वेळी युती नसतानाही भाजप आणि शिवसेनेने वर्चस्व राखले होते. यंदा युती असताना गतवेळच्या तुलनेत एका जागेची भर पडली. गेल्या वेळी भाजपचे १५ तर शिवसेनेचे १४ आमदार निवडून आले होते.

यंदा भाजपचे १६ तर शिवसेनेचे १४ उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे संख्याबळ पाचवरून एकाने घटून चार झाले तर राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली.

मुंबईतील ३६ पैकी २६ जागा या उपनगरात तर १० जागा शहरात आहेत. मुंबई शहरातील १० पैकी आठ जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या आहेत. धारावी आणि मुंबादेवी या दोन जागा काँग्रेसने कायम राखल्या. उपनगरातील २६ पैकी २२ जागा युतीने, दोन जागा काँग्रेस तर राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने प्रत्येकी एक जागाजिंकली. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढूनही भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व होते. हाच कल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कायम राहिला आहे.

काँग्रेसचे चारपैकी तीन आमदार हे अल्पसंख्याक समाजातील आहेत. गुजराती भाषक हे पारंपरिकपणे भाजप आणि शिवसेनेला पाठिंबा देतात.

उत्तर भारतीय आणि झोपडपट्टीधारक मतदार हे पूर्वी काँग्रेसला साथ देत असत. काही प्रमाणात मराठी मतदार, उत्तर भारतीय, झोपडपट्टीधारक, अल्पसंख्याक मतदारांच्या पाठिंब्यावर मुंबईत काँग्रेसच्या विजयाचे गणित जमत असे. पण २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून मतांचे हे गणित बदलले. उत्तर भारतीय, गुजराती, काही प्रमाणात दलित, झोपडपट्टीधारक मतदार हे भाजपच्या पाठीशी उभे राहू लागले. याचा फटका काँग्रेसला बसला. महानगरपालिका निवडणुकीतही असेच चित्र होते. लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीत हाच कल कायम राहिला.

‘मातोश्री’च्या अंगणातील पराभव जिव्हारी

मुंबईत मोठा भाऊ कोण यावरून भाजप आणि शिवसेनेत स्पर्धा असते. महानगरपालिका निवडणुकीत भाजपपेक्षा दोन जागा जास्त जिंकून शिवसेनेने मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वाटय़ाला जास्त जागा आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही भाजपने शिवसेनेपेक्षा एक जागा जास्त जिंकून मोठय़ा भावाची भूमिका वठविली आहे.  ‘मातोश्री’च्या अंगणातील पराभव शिवसेनेला फारच जिव्हारी लागला आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळेच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभव पत्करावा लागला. महापौर महाडेश्वर यांचा सहा हजार मतांनी पराभव झाला.

बंडखोर उमेदवार आणि मावळत्या आमदार तृप्ती सावंत यांना २४ हजार मते मिळाली. शिवसेनेतील दोघांच्या वादात काँग्रेसचे झिशान सिद्दीकी निवडून आले. अन्य दोन मतदारसंघांतील भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर अधिकृत उमेदवारांना त्रासदायक ठरतील अशी शक्यता होती, पण दोन्ही अधिकृत उमेदवार निवडून आले.

आश्वासनपूर्तीचे आव्हान : मुंबईतील मेट्रो, पायाभूत सुविधांची विविध कामे भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. याचा भाजप-शिवसेनेला फायदा झाला. मुंबईतील प्रश्न आम्हीच सोडवू, असे आश्वासन भाजप आणि शिवसेनेने प्रचारात दिले होते. मुंबईकरांनी पुन्हा युतीवर विश्वास दाखविला आहे. मुंबईतील वाहतूक प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान युतीसमोर असेल.