कोल्हापूर : पुणे- कोल्हापूर-पुणे असा प्रवास करीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकीकडे मतदारांशी संपर्क तर दुसरीकडे मतदानाचे कर्तव्य सोमवारी पार पाडले. दुपारपर्यंत कोथरूड या पुण्यातील मतदारसंघात ठाण मांडलेले पाटील यांनी कोल्हापूरकडे प्रयाण करत मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर ते पुन्हा आपल्या कोथरूड या मतदारसंघाकडे वळाले. दरम्यान मतदानानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी दीड लाखाहून मताधिक्याने माझा विजय होईल तसेच राज्यात युतीचे २५० हून अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कोल्हापुरातील सर्व १० जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले पाटील हे पुण्यातील कोथरूड  मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आज सकाळी त्यांनी मतदारसंघात सर्वत्र फिरत मतदान प्रक्रियेचा अंदाज घेतला. उत्साही मतदानानंतर पाटील दुपारी कोल्हापुरात आले. कळंबा येथील शिलादेवी डी. शिंदे हायस्कूलमधील मतदानकेंद्रात त्यांनी मतदान केले.

यावेळी पत्रकांराशी संवाद साधताना त्यांनी कोथरूडमधून दीड लाखाच्या फरकाच्या मताधिक्याने निवडून येऊन असे सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणूक ही जनतेने हाती घेतली होती त्यामुळे युतीचे २५० हून अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूरमध्ये सर्व १० जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.