नीरज राऊत

लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघाचा शिवसेनेचा हट्ट भाजपला पूर्ण करावा लागला. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची अपेक्षा वाढली आहे. भाजपलाही जास्त जागा हव्या आहेत. वसई पट्टय़ात वर्चस्व असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसमोर या वेळी अस्तित्वाचे आव्हान आहे.

पालघर जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पालघर, बोईसर, नालासोपारा व वसई हे चार मतदारसंघ मिळावेत, अशी शिवसेनेची मागणी आहे. शिवसेना भाजपा सर्व मतदारसंघांमध्ये इच्छुकांची मोठी संख्या असून बंडाळी टाळण्यासाठी  दोन्ही पक्षांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ल्यात पिछाडीवर पडलेल्या बहुजन विकास आघाडीला नव्याने प्रस्थापित होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

गेल्या विधानसभा  निवडणुकीत बहुजन विकास आघाडी वसई, नालासोपारा, बोईसर या मतदारसंघात, भाजपाने विक्रमगड व डहाणू तर शिवसेनेने पालघर मतदार संघांमध्ये विजय संपादन केला होता. शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाल्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे त्यांचे चिरंजीव अमित घोडा विजय झाले होते. २०१८ मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या  माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांची निवड झाली होती. लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघ शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला आणि भाजपला युतीसाठी हा मतदारसंघ सोडावा लागला होता.

लोकसभा निवडणुकीत धक्का

पालघर जिल्ह्य़ात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व होते. २००९ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात ठाकूर यांच्या आघाडीने विजय संपादन केला होता. गेल्या निवडणुकीत तीन आमदार निवडून आले होते. पण पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि गेल्या मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार मागे पडला. विशेष म्हणजे वसई या बालेकिल्ल्यात हितेंद्र ठाकूर यांच्या आघाडीचा उमेदवार पिछाडीवर पडला. यातच बोईसरचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळेच हितेंद्र ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

शिवसेनेकरिता पालघर विधानसभेची जागा सर्वात सुरक्षित मानली जात असून लोकसभेला येथून शिवसेनेला सुमारे ६० हजारांहून अधिक मताधिक्य होते. या ठिकाणी आमदार अमित घोडा यांच्यासह श्रीनिवास वनगा इच्छुक असून मतदारसंघाबाहेर उमेदवारी द्यावयाची असल्यास खासदार राजेंद्र गावीत यांची कन्या राजश्री गावीत यादेखील यादेखील इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. पालघरच्या जागेसाठी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांच्या विधिमंडळात संधी देण्याचे आश्वासनाची पूर्तता होते की पुन्हा एखादे कारण काढून अन्य एखाद्या उमेदवाराला संधी दिली जाते हे या निवडणुकीत उत्सुकतेचे विषय ठरणार आहे.

विलास तरे यांना सेनेची उमेदवारी?

बोईसरचे माजी आमदार विलास तरे यांनी पक्षांतर केल्याने त्यांची शिवसेनेतून उमेदवारी मिळू शकते. या मतदारसंघांमध्ये कोकण विकास पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे इच्छुक आहेत.

डहाणू मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार तसेच जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे इच्छुकांची यादीत पुढे असले तरी त्याच्या सुमार कामगिरीमुळे त्यांच्याविषयी नाराजी आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांचे नाव देखील चर्चेत आहे. या मतदारसंघात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला मित्र पक्षाची किती प्रमाणात मदत मिळते हे महत्वपूर्ण ठरणार आहे. येथे माकपची हक्काची मतपेढी आहे.

विक्रमगड मतदारसंघात माजी मंत्री विष्णू सवरा यांच्या जागी भाजप व त्यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सवरा यांना संधी देण्याची दाट शक्यता आहे.  सवरा यांना प्रकृती साथ देत नसल्याने भाजपामधून आदिवासी सेलचे अध्यक्ष हरिश्चंद्र भोये, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा थेतले हेदेखील उत्सुक आहेत.

नालासोपारा विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत मतांची मोठी आघाडी मिळाल्याने भाजप-शिवसेना युतीला हा मतदारसंघ सुरक्षित आणि आशेचा वाटू लागला आहे.  माजी पोलीस अधिकारी आणि चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी या मतदारसंघातून लढण्याचे जाहीर केले आहे. यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक हे उमेदवारीचे दावेदार असून भाजपने हा मतदारसंघ पूर्वीपासून बांधल्याने भाजपालाच उमेदवारी मिळण्याची आशा होती. या मतदार संघातील उत्तर भारताीय मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

वसईत उमेदवारीबाबत उत्सुकता

वसई मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे. ख्रिश्चन समाजातील मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे युतीतर्फे ख्रिश्च्रन समाजातील उमेदवार रिंगण्यात उतरविण्याची चाचपणी करण्यात आली होती.

सामाजिक कार्यकर्ते आणि कवी सायमन मार्टिन यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून तर प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र काँग्रेसने ऐनवेळी ओनिल आल्मेडा यांचे नाव पुढे केले. त्यामुळे नाराज झालेल्या विजय पाटील यांनी शिवसेनेची वाट धरली. त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. माजी आमदार विवेक पंडित या मतदारसंघातून इच्छुक होते.  पण त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.

हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पूत्र क्षितिज हे दोन विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात उतरणार का, याचीही उत्सुकता आहे.

बोईसरमध्ये २५ हजार नवे मतदार

१५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान झालेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात राज्यभरात आठ लाख नवीन मतदार नोंदले गेले असून त्यापैकी ५१ हजार मतदार पालघर जिल्ह्य़ात नोंदविले गेले आहेत. त्यापैकी नालासोपारामध्ये सुमारे २५ हजार तर बोईसर मतदारसंघात १३ हजार मतदार संख्या वाढल्याचे दिसून येते. यामुळे २०१८ मध्ये झालेली लोकसभेची पोटनिवडणूक तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी याच पद्धतीने झपाटय़ाने मतदार नोंदणी झाल्याने हा सर्व प्रकार संशयाच्या भोव-यात सापडला होता त्याची पुनरावृत्ती होत आहे.

राजकीय चित्र : पालघर

वसई : बहुजन विकास आघाडी

नालासोपारा : बहुजन विकास आघाडी

बोईसर : बहुजन विकास आघाडी

डहाणू : भाजप

विक्रमगड : भाजप

पालघर : शिवसेना