|| अविनाश कवठेकर

वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा;- भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची उमेदवारी कोणाला, हीच चर्चा आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांकडून एकमेकांविरोधात कुरघोडीचे प्रयत्न सुरू असल्यामुळे एका बाजूला भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच, तर दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेमध्ये अस्वस्थता असे चित्र आहे. या मतदारसंघात शिवसेनेलाही मानणारा वर्ग आहे. मात्र युती होणार का आणि झाली तर हा मतदारसंघ शिवसेनेला खेचून आणता येणार का, या मुद्दय़ांबाबत स्पष्टता नसल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही या दोन्ही पक्षात युती होईल, अशी चर्चा आहे. सध्याच्या कोथरूड मतदारसंघात जुन्या शिवाजीनगर मतदारसंघाचा बहुतांश भाग येतो. जुना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ असतानाही युतीत तो मतदारसंघ कोणाच्या ताब्यात राहावा, याबाबत एकमत व्हायचे नाही. त्यामुळे युतीत या मतदारसंघाचा निर्णय शेवटपर्यंत ताणला जात असे असा इतिहास आहे.

या पाश्र्वभूमीवर युतीच्या चर्चेत कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा केंद्रबिंदू राहण्याची शक्यता आहे. युतीच्या जागावाटपात कोथरूड विधानसभा मतदारसंघ शेवटपर्यंत चर्चेत राहणार असल्याचे चित्र असून त्याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्याच हाती असेल हेही स्पष्ट आहे.

झपाटय़ाने विस्तार झालेले उपनगर अशी कोथरूडची ओळख आहे. मात्र वाढते नागरीकरण, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांवरील ताण, उड्डाणपूल, जुन्या सोसायटय़ांच्या पुनर्विकासाचा प्रश्न, सुरळीत पाणीपुरवठा, रस्ते रुंदीकरण असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत. यातील बहुतांश प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचा दावा सत्ताधारी भाजपकडून करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला, सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूड विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. गेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा तब्बल ६४ हजार ६६२ मतांनी येथून पराभव केला. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना मताधिक्य मिळवून देण्यात कोथरूड मतदारसंघ अव्वल ठरला होता.

या मतदारसंघातून बापट यांना सर्वाधिक एक लाख सहा हजार १९६ मतांचे अधिक्य मिळाले होते. हीच बाब भाजपची या मतदारसंघातील ताकद स्पष्ट करणारी आहे. त्यामुळे विधानसभेसाठी मतदारसंघातून भाजपकडून अनेक इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी केली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला देऊ नये, अशी मागणी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भाजपमधील  इच्छुक उमेदवारांमधील संघर्षही शिगेला पोहोचला असून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

शिवसेनेची ताकद लक्षात घेता मतदारसंघ मिळावा, अशी मागणी असली तरी पक्ष प्रमुख घेतील तो निर्णय मान्य असेल, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. भाजपची वाढती ताकद लक्षात घेता हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार का, याचीच चिंता भाजपच्या इच्छुकांना भेडसावत आहे. सध्या तरी शिवसेनेकडून केवळ दावाच करण्यात येत आहे. युती झाली नाही तरी या मतदारसंघातील लढत ही भाजप-सेना उमेदवारांमध्येच असेल, असेही चित्र आहे.

भाजप-शिवसेना युतीमध्ये रस्सीखेच आणि अस्वस्थता दिसून येत असताना आघाडीमध्ये मात्र सक्षम उमेदवार नसल्याचे चित्र आहे. हा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. मात्र मित्रपक्ष कोण हे स्पष्ट झालेले नाही. या मतदारसंघात मनसेकडे उमेदवार असले तरी त्यांना गेल्या निवडणुकीत मनसेला अधिक मते मिळाली नव्हती, ही देखील वस्तुस्थिती आहे.

मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न बिकट होता. त्या दृष्टीने चांदणी चौकातील उड्डाणपुलाला मंजुरी मिळवली. मेट्रो मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत मतदारसंघात ६०० कोटींची कामे प्रस्तावित आहेत. त्यापैकी २९० कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. बाणेर-बालेवाडी येथील पाणीपुरवठय़ाचा प्रश्नही सोडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नदीपात्रातील रस्ता तसेच बालभारती ते पौड रस्त्याचे काम सुरू करण्यासंदर्भातील पाठपुरावा कायम आहे.-प्रा.  मेधा कुलकर्णी, आमदार, कोथरूड

पाच वर्षांत विद्यमान आमदारांना कोथरूडमधील प्रश्न सोडविता आलेले नाहीत. नदीकाठ रस्त्याचे विकसन, पाणीपुरवठा, सोसायटय़ांचा पुनर्विकास हे प्रश्न कायम आहेत. पायाभूत सुविधा उभारता आलेल्या नाहीत. निधीही आणता आलेला नाही. झोपडपट्टय़ांची संख्याही वाढत आहे. दूरदृष्टीच्या अभावामुळेच कोथरूडचा विकास खुंटला आहे. -उमेश कंधारे, काँग्रेस उमेदवार (२०१४ ची निवडणूक)