भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होऊ न जागा वाटप जाहीर  झाले नसल्याने अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची कोंडी झाली आहे. तर काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवारही त्यामुळे जाहीर होण्यास विलंब होत आहे.

नगर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदार संघांपैकी स्नेहलता कोल्हे (कोपरगाव), शिवाजी कर्डीले (राहुरी), मोनिका राजळे (पाथर्डी), पालकमंत्री राम शिंदे (कर्जत-जामखेड), बाळासाहेब मुरकुटे (नेवासे) हे भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. तर गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे (शिर्डी) व वैभव पिचड (अकोले) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या सर्व जागा युतीच्या जागा वाटपात भाजपाला सोडाव्या लागणार आहेत. तर विधानसभेचे उपसभापती विजय औटी (पारनेर)  हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. भाजपाने २० टक्के जुन्या आमदारांना उमेदवारी न देण्याचे ठरविले आहे. नेवासे व कोपरगावची जागा शिवसेनेला सोडावी, असा प्रस्ताव आहे. मुरकुटे व कोल्हे यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

नेवाशाची जागा शिवसेनेला सुटली, तर माजी आमदार शंकर गडाख व कोपरगावच्या जागेवर आशुतोष काळे हे सेनेचे उमेदवार होऊ  शकतात. सध्यातरी गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षात तर काळे राष्ट्रवादीत आहेत. काळे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या कार्यत मांना हजेरी लावत नाहीत. त्यांचा आजार हा राजकीय असल्याची चर्चा सुरु  झाली आहे. या दोन्ही जागांची अदलाबदल  झाली नाही तर मुरकुटे व कोल्हे यांनाच पुन्हा भाजपाची उमेदवारी मिळेल. श्रीगोंद्याची जागाही भाजपाऐवजी सेनेला देण्याचा प्रस्ताव आहे. तसे झाले तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची कोंडी होऊ  शकते. ही जागा सेनेला सुटली तर राहुल जगताप हे सेनेचे उमेदवार असतील, अशीही चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडीत या जागा वाटपानंतरच निश्चित होतील.

शिवसेनेने श्रीरामपूर, नगर शहर, पारनेर या तीन जागा मागितल्या आहेत. संगमनेरची जागा भाजपाने लढवावी, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. सेनेने कोपरगाव व श्रीगोंद्याच्या जागेचा हट्ट धरला आहे. आज मुंबईत मातोश्रीवर सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अनेकांनी भेटी घेतल्या. जागा वाटपाचा तिढा कायम असल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार ठरवितानाही अडचणी येत आहेत. अनेक राजकीय अफवांचे जिल्ह्यत पेव फुटले आहेत. युतीचा निर्णय होऊन जागा वाटप निश्चित होत नाही तोपर्यंत इच्छुकांची धाकधूक कायम राहणार आहे.