शिवसेनेसोबतची युती तुटली असं कधीही म्हटलेलं नाही, तसं म्हणणारही नाही असं राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शिवसेनेकडून झालेल्या वक्तव्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. चर्चेची दारं भाजपाने नाही तर शिवसेनेने बंद केली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्यानंतर तुम्ही युती तोडता आहात का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला ज्यावर युती तुटली असं म्हणणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

एवढंच नाही तर आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या आसपास असलेल्या लोकांनी दरी वाढवण्याचं काम केलं असाही आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी वक्तव्य करत आहेत. भाजपा आमदार फोडण्याचं करत आहेत असाही आरोप केला जातो आहे. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की तुम्ही पुरावे द्या नाहीतर माफी मागा. सरकार स्थापन करताना आम्ही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही हे आश्वासन देतो. येत्या काळात भाजपाचंच सरकार येईल हा विश्वास मी व्यक्त करतो आहे. जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विरोधी पक्षांचेही मी आभार मानतो असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.