– धवल कुलकर्णी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना संभाव्य शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘महाशिवआघाडीला’ समाजवादी पार्टीचे बळ मिळेल अशी लक्षणे दिसू लागली आहेत. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन आमदार निवडून आले आहेत. पक्षाचे मुंबई व महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी सलग तिसऱ्यांदा मानखुर्द शिवाजीनगर मधून विजय मिळवला तर पक्षाचे मुंबईतले नगरसेवक रईस कासम शेख यांनी एका बहुरंगी लढतीत भिवंडी पूर्व मधून पक्षाचा झेंडा फडकवला. या विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सोबत समझोता केला होता.

“शिवसेनेची विचारसरणी वेगळी आहे… पण, शिवसेना व भाजपची युती जर तोडायची असेल तर शिवसेनेला पाठिंबा देणे गरजेचे आहे असे मला वाटते. शेवटी, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो,” असे आझमी यांनी सांगितले. आझमींच्या मते भाजप हा मुस्लिम समाजासाठी शिवसेनेपेक्षा अधिक मोठा शत्रू आहे. याचे कारण असे, की शिवसेनेचा व्याप फक्त महाराष्ट्र पुरताच आहे. तर, भाजप पूर्ण देशभर विस्तारलेला आहे. परंतु, याविषयी समाजवादी पक्ष आपली अंतिम भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रस्ताव दिल्यानंतर, पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना विचारूनच घेईल, असे त्यांनी सांगितले. 1992-93 च्या दंगलीनंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मुलायम सिंग यादव यांच्या समाजवादी पक्षाचा राजकीय उदय झाला. मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात कधीकाळी तुरुंगात असलेले व नंतर कोर्टाच्या आदेशाने निर्दोष सुटलेल्या आझमी यांनी हळूहळू पक्षाच्या महाराष्ट्रातल्या शाखेवर आपली पकड घट्ट केली.

त्याकाळात अबू असीम आझमी हे शिवसेनेचे नंबर एकचे शत्रू होते, हे लक्षणीय. अर्थात, आज समाजवादी पक्षाचा बरचसा राजकीय अवकाश हा असदुद्दीन व अकबरुद्दीन ओवैसी च्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (ए आय एम आय एम) यांनी व्यापला आहे. यापूर्वीसुद्धा काँग्रेसने शिवसेनेबरोबर स्थानिक पातळी वर युत्या किंवा आघाड्या केल्या आहेत असा आझमींचा गर्भित आरोप आहे. भिवंडीमध्ये शिवसेना व काँग्रेसने हात मिळवणी करून भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता स्थापन केली. भिवंडी पूर्वमध्ये रईस शेखच्या विरोधात युती असतानासुद्धा काँग्रेसने उमेदवार दिला याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आमची काँग्रेससोबतची युती ही तीन जागांपुरती होती. आम्ही काँग्रेसला सर्वठिकाणी मदत केली पण काँग्रेसने मात्र युतीचा धर्म पाळला नाही असा त्यांचा आरोप आहे. अर्थात, आता भाजपाला सत्तेपासून थोपवण्यासाठी समाजवादी पार्टी महाशिवआघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता दिसत आहे.