राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीत. कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करण्यासाठी यशस्वी न ठरल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांकडून दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. त्यातच शिवसनेने आपल्या सामतून केलेल्या टीकेनंतर आता भाजपानं शिवसेनेला धारेवर धरलं आहे. “आम्ही सामना वाचत नाही. जे त्यात लिहितात तेच ते वाचतात. शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी झाले आहेत,” अशी टीका भाजपाचे प्रवक्ते जीवीएल नरसिंम्हा राव यांनी केली आहे.

“आम्ही आहोत त्याच ठिकाणी आहोत. तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्ही घराचा एक भाग आहात, असं कसं म्हणू शकता? दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्त काही वेगळ वक्तव्य करतात आणि आज काही वेगळ वक्तव्य करत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आजकाल गजनी झाले आहेत,” अशी टीका राव यांनी केली. “महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही उत्तम सरकार देण्याचं आश्वासन दिलं होतं. जर कोणी विश्वासघात केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे. जे पक्ष राजकारणासाठी सत्तेच्या शोधात होते, तेच विखुरल्यासारखे दिसत आहेत,” असंही ते म्हणाले.

शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा भाजपाकडूनच करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली होती. शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे,” असंही ते म्हणाले होते. आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? असा सवाल शिवसनेकडून करण्यात आला आहे. ‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. साधी चर्चा नाही, चिठ्ठीचपाटी नाही. ज्या ‘एनडीए’चे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या ‘एनडीए’तून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली आहे.