राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा व शिवसेना नेत्यांकडून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याचे दिसत आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी आज राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. प्रसाद लाड हे धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले होते. सध्या सुरू असलेल्या जोरदार राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मह्त्व प्राप्त झाले आहे.

या अगोदर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. तर, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी देखील संजय राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दलवाई यांनी राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. तर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील राज्यात भाजपाचे सरकार नको हीच काँग्रेसजनांची इच्छा असल्याचे सांगितले आहे. शिवाय काँग्रेसचा एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. शिवेसेनेने उद्या मातोश्रीवर आमदारांची मह्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

दुसरीकडे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असल्याचे, भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी तसे संकेत दिले आहे. “आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे सरकार आमचंच येणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत,” अशी माहिती दिली आहे.