बुधवारी प्रचारसभेदरम्यान शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ओमराजे हे किरकोळ जखमी झाले होते. याप्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराने नाव अजिंक्य टेकाळे असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे टेकाळे हा भाजपा जिल्हा आयटी सेलचा प्रमुख असल्याचे समजते.

बुधवारी सकाळी कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे निंबाळकर शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारसभेसाठी गेले होते. ओमराजे सभेच्या ठिकाणाकडे जाण्यासाठी निघाले असता अनेक समर्थक त्यांच्या दिशेने हस्तांदोलन करण्यासाठी आले. त्याचवेळी हस्तांदोलन करताना अजिंक्य यांने ओमराजेंवर चाकूने हल्ला केला. मात्र सुदैवाने वार घडळ्यावर लागल्याने निबांळकर यांना फारशी इजा झाली नाही. चाकू हल्ला झाल्याने एकच गोंधळ झाला. या गोंधळाचा फायदा घेऊन अजिंक्यने तेथून पळ काढला. मात्र काही शिवसैनिकांनी त्याचा पाठलाग केला. अजिंक्य एका घरात जाऊन लपला. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या शिवसैनिकांनी या घराला गराडा घातला. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संतप्त शिवसैनिकांना आवर घालत त्यांनी अजिंक्यला ताब्यात घेतले.

या हल्ल्यात निंबाळकर किरकोळ जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. “आपण सुखरूप आहोत. प्रचारासाठी नायगाव पाडोळी येथे आलो होतो. त्यावेळी त्या ठिकाणी एक गटही होता. त्या गटातून अचानक एक तरूण माझ्या समोर आला. त्यानं माझा एक हात हातात घेऊन दुसऱ्या हाताने माझ्यावर वार केला,” अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली होती.

दरम्यान, निंबाळकरांनी भाजपविरोधी वक्तव्य केल्यानं अजिंक्यने त्यांच्यावर चाकू हल्ला करण्याचे पाऊल उचलल्याची चर्चा बुधवारी दिवसभर नायगाव पाडोळी गावात रंगली होती. निंबाळकर हे भाजपद्वेष करत असल्याने आपण त्यांच्यावर हल्ला केला असल्याचा कबुली अजिंक्यने दिली आहे. अजिंक्य हा भांडखोर असून त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचंही अनेक गावकरांनी पत्रकारांना सांगिले.