पावसामुळे पुण्यात बुधवारी होणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा रद्द झाली. या सभेपासून राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुकणार होते. पण पावसाच्या खेळामुळे अखेर ही सभा रद्द करावी लागली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. आज राज ठाकरे यांची पहिलीच निवडणूक प्रचाराची सभा सांताक्रूझ आणि गोरेगाव येथे होणार आहे. मात्र असे असले तरी काल पुण्यात रद्द झालेल्या सभेवरुन भाजपा समर्थकांनी राज यांना टोला लगावला आहे.

‘पावसामुळे पुणेकर कॉमेडी नाईट्स विथ राज ठाकरे या कार्यक्रमाला मुकले’ असा टोला भाजपा समर्थकांनी लगावला आहे. फेसबुकवरील ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ या भाजपा समर्थकांच्या पेजवरुन राज यांची सभा रद्द झाल्यानंतर एक पोस्ट करुन मनसे समर्थक आणि राज यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मोदीजी आणि फडणवीसांनी पाडला कृत्रिम पाऊस मंद सैनिकांमध्ये शंकांचा पूर’ असे वाक्य या पेजवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोवर लिहिण्यात आले आहे. या पोस्टमध्ये राज यांची सवाल उपस्थित करणाऱ्या मृद्रेतील फोटो वापरण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यातील नातू बाग येथील मैदानावर राज यांची सभा होणार होती. मंगळवारी रात्री पुण्यात जोरदार पाऊस झाल्याने सभेच्या ठिकाणी मैदानावर चिखल आणि पाणी साचले. त्यामुळे राज यांच्या सभेबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. पण बुधवारी सकाळपासूनच पुण्यातील मनसेचे नेते, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर मैदानाच्या साफसफाईचे काम हाती घेतले. मात्र बुधवारी संध्याकाळपासून पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक कार्यकर्ते डोक्यावर खुर्च्या घेऊन सभा सुरु होण्याची वाट पाहत होते. मात्र पावसाचा जोर थांबला नाही. अखेर सभा रद्द करण्यात आल्याची घोषणा मनसेने केली. आज राज यांची मुंबईमध्ये दोन ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे.