शरद पवार यांचा गौप्यस्फोट

ठाणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख टाळत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी ठाण्यात भाजपचे नाराज नेते गेल्या तीन-चार महिन्यांपासून संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. या वक्तव्यामुळे भाजपचे नाराज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कळवा-मुंब्रा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज उमेदवारी भरण्यासाठी गुरुवारी काढलेल्या मिरवणुकीत पक्ष अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार हाही उपस्थित होता.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह शिवसेनेने तिकीट नाकारलेले विजय नाहटा हे सर्वजण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पवार म्हणाले, ‘‘सत्ताधारी पक्षाचे अनेकजण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून माझ्याच नाहीतर आमदार जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे आणि अन्य जिल्हाध्यक्षांच्या संपर्कात आहेत. पक्षामध्ये भवितव्य नाही, हे त्यांना समजले आहे. त्यामुळे समाजकारणात काम करणाऱ्यांना जेव्हा संधी तसेच भवितत्व नसल्याचे लक्षात येते, तेव्हा ते पर्याय शोधत असतात. हा पर्याय एका दिवसात शोधला जात नाही.’’ भाजपमधील अनेकजण आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

आवाज दाबला जातो – कन्हैय्या कुमार : महाराष्ट्रात प्रतिगामी शक्ती लढणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवार यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हे त्याचे उदाहरण आहे. ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून दबाव निर्माण केला जात आहे. तसेच समता आणि धर्मनिरपेक्षतेसाठी आमदार आव्हाड लढत असून त्यामुळेच त्यांच्या प्रचारासाठी ठाण्यात आलो आहे, असे कन्हैय्या कुमार यांनी सांगितले. या देशात रामाच्या नावावर नथुरामाचे सरकार चालवणारे लोक सत्तेवर आले आहेत. स्मार्ट सिटी तयार करण्याची नवी योजना आणली आहे. मात्र, ठाणे आणि मुंबईमध्ये पावसाळ्यात एवढे पाणी साचते की त्यामध्ये मत्स्यपालन करता येईल, अशी टीका त्याने सरकारवर केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कनैय्या कुमार याने टीका केली.

राज्यात परिवर्तन.. : ईडी प्रकरणापुर्वी राज्यभर केलेल्या दौऱ्यात तरुणांपासून ते वृद्धांपर्यत सर्वाचा चांगला प्रतिसाद मिळला. ईडी प्रकरणानंतर मात्र या प्रतिसादामध्ये आणखी वाढ झाली असून गेल्या ५० वर्षांच्या काळात मला अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे राज्यात यंदा परिवर्तन होईल, असा दावा पवार यांनी केला.