|| रमेश पाटील

२००९ पासून निर्माण झालेल्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व स्थापन केलेले असले तरी गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष व बहुजन विकास आघाडीने पाळेमुळे घट्ट रोवल्याने भाजपला विक्रमगड मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय संपादन करणे आव्हानात्मक ठरणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये चार-सहा हजारचे मताधिक्य भाजपकडे होते. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचा उमदेवार पिछाडीवर असल्याने युतीकरिता यावेळी विक्रमगडचा पेपर कठीण राहणार आहे.

२००९ मध्ये राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात जव्हार, मोखाडा, विक्रमगड तिन्ही तालुक्यातील सर्व गावांचा व वाडा तालुक्यातील कंचाड मंडळातील ४९ मतदान केंद्रांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या व पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अ‍ॅड चिंतामण वणगा निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे चिंतामण वणगा यांना विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून ३२ हजार मतांची आघाडी मिळाली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड मतदारसंघातून भाजपचे विष्णू सवरा हे तिरंगी लढतीत अवघ्या ३८८४ मतांनी विजयी झाले होते. या लढतीत शिवसेनेकडून मोखाडा पंचायत समितीचे तत्कालीन सभापती प्रकाश निकम, राष्ट्रवादी काग्रेसचे सुनील भुसारा, काँग्रेसचे अशोक पाटील, बहुजन विकास आघाडीकडून हेमंत गोविंद, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे रतन बुधर यांच्यासह अन्य सात उमेदवार रिंगणात होते.

खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनानंतर मे २०१८ मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपत प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्यावर ५३५४ चे मताधिक्य मिळविले, तर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने १३,२९९ मते मिळवली होती. मात्र २०१९च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ५७५४ चे युती उमेदवारापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन युतीला चांगलाच झटका दिला. यामुळे विक्रमगड मतदारसंघात आघाडीकडून लढविणाऱ्या उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

या मतदारसंघातील विद्यमान आमदार विष्णु सवरा यांना साडेचार वर्षे कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली. मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी झाई-बोर्डी, डहाणू, कासा, तळवाडा, जव्हार, मोखाडा, नाशिक या राष्ट्रीय महामार्गासाठी मंजुरी मिळवली आहे. तसेच कुपोषण रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना तसेच मंत्रिपदावर असताना घेतलेले निर्णय हे भाजप उमेदवाराची जमेची बाजू असल्याचा दावा विष्णू सवरा

यांनी केला आहे. विक्रमगड तालुक्याची निर्मिती होऊन २० वर्षांचा कालावधी होऊनही या ठिकाणी पुरेशी कार्यालये अजूनही सुरू झालेली नाहीत, जी कार्यालये सुरू आहेत त्यामध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने तालुक्याचा विकास मंदावला आहे.

विक्रमगड मतदारसंघातील जव्हार, मोखाडा तालुक्यातील हजारो कुटुंबे ही आजही रोजगारासाठी स्थलांतरित होत आहेत. वीज, पाणी, दळणवळण या सुविधांपासून अनेक गाव, पाडे वंचित आहेत, अशा अनेक समस्या या मतदारसंघात अजूनही प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे.

झालेली कामे

  •  मतदारसंघातील रस्ते व पुलांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती
  •  वसतिगृह अपूर्णावस्थेतील बांधकामे पूर्ण
  •  विकासकामांसाठी साधारण ५०० कोटी निधी खर्च
  •  जव्हार व साखरा येथे उपकेंद्र
  •  कुपोषण निर्मूलनासाठी पोषण आहार योजनेची निर्मिती व प्रभावी अंमलबजावणी
  •  महिलांच्या रोजगारासाठी केंद्र

प्रलंबित कामे

  •  मतदारसंघातील विRमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट कायम
  •  स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्यात अपयश
  •  दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणा कोलमडलेली दिसतेय
  •  सिंचन व्यवस्था कोलमडलेली
  •  बस आगाराची व्यवस्था नाही
  •  स्वतंत्र न्यायालय नाही

विक्रमगड मतदारसंघातील आदिवासी बांधवांसाठी वेगवेगळ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी, कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबत पेसा कायदा अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान राहिले. आदिवासी विकास विभागातर्फे मनोर येथे वारली हाट प्रकल्पासह रस्ता, पाणीपुरवठा व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी योजना आखण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी अनेक योजना आखण्यात येऊन सातत्याने पाठपुरावा केला. – विष्णू सवरा, आमदार, विक्रमगड

 

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात ८० टक्के आदिवासी समाज राहतो, या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारी आहे. येथे एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून उद्योगधंदे आणून रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. पण, आजवर तसा प्रयत्न केला गेलेला नाही. आरोग्याच्या सुविधा, पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था, तसेच दळणवळणाच्या सुविधांचा अभाव या मतदारसंघात दिसून येतो. – राहुल धूम, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी, रा. विक्रमगड