एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. देशातील भाजपाच्या कारभारावर बोलताना ही ड्रामा कंपनी काँग्रेस कमजोर पडल्यामुळेच यशस्वी झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युएपीए कायद्यात बदलावेळी संसदेतील काँग्रेसच्या भुमिकेवरुन त्यांनी हे भाष्य केले आहे.

ओवेसी म्हणाले, “काँग्रेस आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण या पक्षामध्ये आता लढण्याची ताकद राहिलेली नाही. काँग्रेस कमजोर पडल्यामुळेच भाजपाची ड्रामा कंपनी यशस्वी झाली आहे. जेव्हा संसदेत मोदी सरकारने इंदिरा गांधींनी आणलेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याला (युएपीए) घाणेरडे स्वरुप दिले, तेव्हा काँग्रेस कुठे होती?” असा सवाल त्यांनी केला.

मोदी सरकारने युएपीए कायद्यात केलेल्या बदलांवर टीका करताना ओवेसी म्हणाले, “दहशतवादाच्या नावाखाली आता याद्या तयार केल्या जातील. एखाद्याचे नाव यामध्ये लिहिले जाईल, त्यानंतर त्याला दहशतवादी घोषीत केले जाईल. त्यामुळे त्याचे जीवन उद्ध्वस्त होईल, तो कोर्टातही जाऊ शकणार नाही. कोर्टही त्याला दहशतवादी घोषीत करेल, अशा पद्धतीचा कायदा सरकारने आणला असून काँग्रेसने त्याला पाठींबा दिला आहे.”

काही दिवसांपूर्वी ओवैसींनी राहुल गांधींवर टीका करता म्हटले होते की, जेव्हा कुठलेही जहाज बुडत असते तेव्हा त्या जहाजाचा कॅप्टन सर्वांना आधी सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मिस्टर गांधी असे कॅप्टन आहेत ज्यांनी काँग्रेसचे बुडते जहाज पाहत स्वतःच ते सोडून पळाले.