प्रताप सरनाईक, प्रशांत ठाकूर, अबू आझमी, मेघे यांची संपत्तीही वाढली; ‘एडीआर इंडिया’ ची माहिती

विधानसभा निवडणूक लढविणारे पाच विद्यमान आमदार प्रचंड श्रीमंत झाले असून, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या मालमत्तेत २४३ कोटी एवढी सर्वाधिक वाढ झाली आहे. राज्यातील भाजपच्या विद्यमान आमदारांची सरासरी मालमत्ता ही २५ कोटी रुपये असल्याचे ‘एडीआर इंडिया’या संस्थेने उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून माहिती संकलित केली आहे.

‘एडीआर’ने पुन्हा निवडणूक लढवीत असलेल्या १९२ विद्यमान आमदारांच्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास केला. फेरनिवडणूक लढविणाऱ्या सात आमदारांच्या मालमत्तेबाबत संस्थेला माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. विद्यमान आमदारांपैकी पाच आमदारांची चांगलीच भरभराट झाली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे येथे लोढा संकुले उभी राहात आहेत. या उद्योग समूहाशी थेट किंवा कागदोपत्री संबंध नसला तरी मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र या कंपनीचे पदाधिकारी आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १९८ कोटी रुपयांची मालमत्ता दाखविली होती. या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात त्यांनी ४४१ कोटींची मालमत्ता असल्याची माहिती दिली आहे. पाच वर्षांत लोढा यांच्या मालमत्तेत १२२ कोटींनी वाढ झाली. वेतन आणि गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न हे लोढा यांनी उत्पन्नाचे स्रोत दाखविले आहेत.

पनवेलचे भाजप आमदार आणि ‘सिडको’चे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या मालमत्तेत पाच वर्षांत १२४ कोटींनी वाढ झाली. शेती आणि लाभांशामधून हे उत्पन्न मिळाल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तब्बल ४७४ टक्के एवढी सर्वाधिक वाढ झाली. पाच वर्षांपूर्वी सरनाईक यांची मालमत्ता ही २५ कोटी होती ती आता १४३ कोटी रुपये झाल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. बांधकाम आणि हॉटेल व्यवसायातून उत्पन्न मिळाल्याची माहिती सरनाईक यांनी प्रतिज्ञापत्रात सादर केली.

एकेकाळचे शिक्षणसम्राट आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र व भाजप आमदार समीर मेघे यांची मालमत्ता पाच वर्षांत ४८ कोटींवरून १५९ कोटी रुपये झाली आहे. मुंबईतील समाजवादी पार्टीचे आमदार अबू असिम आझमी यांची मालमत्ता १५६ कोटींवरून २०९ कोटी रुपये झाली.

पक्षनिहाय विद्यमान आमदारांची सरासरी मालमत्ता

भाजप    २५ कोटी

शिवसेना  १४ कोटी

काँग्रेस    १३ कोटी

राष्ट्रवादी  १७ कोटी