समीर जावळे 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रासाठीची विधानसभेची निवडणूक सोमवारी पार पडली. या निवडणुकीत ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरलेला पाहण्यास मिळाला. त्यानंतर लगेचच आले ते एग्झिट पोल. या सगळ्याच एग्झिट पोल्सनी पुन्हा एकदा देवेंद्र सरकार येईल असा दावा केला. मात्र या सगळ्यांमध्ये दखल घेण्यासाठी एक गोष्ट ठरली ती म्हणजे अदखलपात्र राज ठाकरे. मनसेला जवळपास सगळ्याच एग्झिट पोल्सनी स्वतंत्र स्थान दिलं नाही. तर ज्यांनी स्वतंत्र स्थान दिलं त्यांनी मनसेला शून्य जागा मिळतील हा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे ज्या प्रसारमाध्यमांसाठी राज ठाकरे आजही महत्त्वाचे आहेत त्याच प्रसारमाध्यमांनी त्यांना एग्झिट पोल्समध्ये अदखलपात्र ठरवलं आहे.

‘एबीपी सी व्होटर्स’ने महायुतीला २०४ जागा दिल्या आहेत. तर आघाडीला ६९ जागा दिल्या आहेत. इतरांना १५ जागा दिल्या आहेत. मात्र मनसेला स्वतंत्र स्थान दिलेलं नाही. ‘टीव्ही नाईन सिसेरो’ने महायुतीला १९७ जागा दिल्या आहेत. आघाडीला ७५ जागा दिल्या आहेत. इतरांना १६ जागा दिल्या आहेत. मनसेचं वेगळं स्थान दिलं आहे पण त्यांना जागा दिल्या आहेत शून्य. ‘सीएनएन न्यूज १८’ ने महायुतीला २४३ जागा दिल्या आहेत. आघाडीला ४१ जागा दिल्या आहेत तर इतरांना अवघ्या चार जागा दिल्या आहेत. त्यामध्ये मनसेला स्थान दिलं आहे की नाही हे स्पष्ट नाही.

या तीन एग्झिट पोल्सप्रमाणेच मनसेला अनेकांनी स्थान दिलेलं नाही. तर ज्यांनी स्थान दिलं आहे त्यांनी शून्य जागा दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे १०४ उमेदवार मैदानात उतरवले. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या अशी मागणी राज ठाकरेंनी त्यांच्या सभांमधून केली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतल्या. मात्र त्यांच्या भाषणांमध्ये तोच तोचपणा जाणवत राहिला.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला तेव्हापासून त्यांची राजकारणातली धरसोड वृत्ती कायमच दिसून आली आहे. सुरुवातीच्या काळात राज ठाकरे यांनी कायमच एकहाती सत्ता मागितली. एकहाती सत्ता द्या महाराष्ट्र सुतासारखा सरळ करुन दाखवतो असं आवाहन आक्रमकपणे राज ठाकरे करत असत. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या वेळी  मनसे सर्वात मोठा पक्ष ठरला नाशिकची  सत्ता मिळाली. मात्र ही सत्ता मिळवूनही त्यांना टिकवता आली नाही. ज्या भुजबळांवर टीका करुन राज ठाकरेंनी नाशिकची सत्ता काबीज केली होती. भाषणात भुजबळांची नक्कल वगैरेही केली होती. मात्र त्याच भुजबळांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन पुढची अडीच वर्षे नाशिकमधली सत्ता चालवली. ज्यामुळे नाशिककरांचा विश्वास उडाला. पक्षालाही घरघर लागली.

२०१४ मध्ये देशाच्या विकासासाठी मोदींना निवडून द्या असं आवाहन करणारे राज ठाकरे, गुजरात मॉडेलचं उदाहरण देणारे राज ठाकरे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी  आणि अमित शाह यांना पाडा अशी भूमिका घेऊन मैदानात उतरले. ते कायमच सांगत आले की मी काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे हात पसरले नाहीत, त्यांचा स्वभाव पाहता त्यांनी ते पसरलेही नसतील. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी आपल्याला सोबत घेईल ही अपेक्षा राज ठाकरेंच्या मनात असावी. आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला सोबत घ्यायला काही आडकाठी दाखवली नाही. मात्र काँग्रेसने दाखवली. याचं महत्त्वाचं कारण होतं उत्तर भारतीय मतं हातून जातील याची काँग्रेसला असलेली भीती. एवढंच नाही तर २०१४ मध्ये राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जी काही खिल्ली राज ठाकरेंनी उडवली होती ते काँग्रेस विसरली नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा उतरले खरे. मात्र २००९ मध्ये एकहाती सत्ता मागणारा हा नेता अवघ्या १० वर्षात सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला विधानसभेत पाठवा हे म्हणू लागला. भाषण संपल्यानंतर प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना उभे करुन त्यांचा उल्लेख राज ठाकरेंनी ‘टगे’ असाही केला. यातून त्या उमेदवारांची काय इमेज त्यांना उभी करायची होती ते कळलं नाही. मतदानाची प्रक्रिया आता पार पडली आहे. राज ठाकरेंची सभांची दखल लोकांनी घेतली. मात्र मतपेटीतून ही दखल घेतली आहे की नाही हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. ज्या प्रसारमाध्यमांमध्ये राज ठाकरे कायम चर्चेत असतात, त्याच सगळ्या प्रसारमाध्यमांनी जो एग्झिट पोल घेतला त्यामध्ये राज ठाकरेंना अदखलपात्र ठरवलं आहे हे नक्की!

समीर जावळे

sameer.jawale@indianexpress.com

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog on raj thackerays place in exit polls scj
First published on: 22-10-2019 at 15:04 IST