शेखर जोशी

भाजपने २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविल्या होत्या. या निवडणुकीआधी भाजप शिवसेनेचा काडीमोड झाल्यामुळे भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला न मागताच बाहेरुन पाठिंबा दिला आणि शिवसेनेने विरोधी पक्षात बसायचा निर्णय घेतला. पुढे शिवसेनेतील अस्वस्थता वाढायला लागली, एखादा गट फुटून भाजपला सत्तेत सहभागी होऊन पाठिंबा देईल, अशीही चर्चा सुरु झाली आणि नंतर काही महिन्यात शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. आताही २०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतरची पुनरावृत्ती होणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

२०१९ मध्ये भाजप शिवसेना यांनी युती करुन निवडणूक लढवली. दोघांचे एकत्रित संख्याबळ सहज सत्ता स्थापन करु शकते, पण… हाच पण आता सत्ता स्थापनेत कळीचा मुद्दा ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार? या वरुन युतीत धुसफूस सुरु झालीआहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतक्या जागा मिळाल्या असत्या तर काहीच प्रश्न नव्हता पण भाजप शंभर-एकशे तीन वर अडला त्यामुळेच मुख्यमंत्री कोण? हा कळीचा मुद्दा झाला आहे. भाजपचे घोडे शंभर पर्यंत अडल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधकही हा कळीचा मुद्दा बनवतील. गेल्या वेळी जितक्या जागा निवडून आल्या तेवढ्याही राखता आल्या नाहीत, हा मुद्दा लावून धरुन त्याचे खापर कोणावर तरी फोडले जाईल. आणि ते खापर साहजिकच फडणवीस यांच्यावर फोडण्यासाठी भाजपमधील फडणवीस विरोधक कसून प्रयत्न करतील.

ठाकरे घराण्यातील आदित्य हा निवडणूक लढविणारा पहिला ठाकरे असून तो निवडूनही आला आहे. सुरुवातीपासूनच आदित्य मुख्यमंत्री होणार, अशा प्रकारे त्याला महत्व देण्यात आले. त्यामुळे भाजप बरोबर जायचे असेल आणि नसेल तरीही सत्तेच्या चाव्या आता शिवसेनेच्या हातात आहेत. एकतर आम्हाला मुख्यमंत्रिपद द्या किंवा मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावे अशी मागणी शिवसेनेकडून केली जाणार. हे मान्य नसेल तर अन्य सर्व पर्याय शिवसेनेपुढे असतील. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतही आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगितलेही आहे. आदित्य मुख्यमंत्री झाला तर निश्चितच फडणवीस त्या सत्तेत राहणार नाहीत. मग मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षे वाटून घेणे हाच एक पर्याय भाजपसमोर राहतो.
छगन भुजबळ यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्री व्हायचे, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदी बसायचे की आमच्या पाठिंब्याने पाच वर्षे मुख्यमंत्री व्हायचे, असे खुले निमंत्रण दिले आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, दोन्ही कॉंग्रेस, अपक्ष एकत्र येऊ शकतात. भाजपने २०१४ मध्ये सुरुवातीला राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन तसेच केले होते पण तेव्हा आणि आत्ताच्या परिस्थितीत फरक आहे. तेव्हा निवडणूकपूर्व युती केली नव्हती यावेळी ती केली गेली होती. पण ठाकरे घराण्यातील युवा पिढीला थेट मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर उद्धव ठाकरे हा जुगार खेळतील का? मग तसे झाले तर केंद्रातील सत्तेतूनही बाहेर पडणार का? असे प्रश्न निर्माण होतात.

तसे झाले तर भाजप विरोधी पक्षात बसेल. फडणवीस यांना केंद्रात घेतले जाईल. चंद्रकांत पाटील विरोधीपक्ष नेते होतील किंवा तसे झाले नाही आणि भाजप शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावे असे ठरले तरीही फडणवीस महाराष्ट्रात राहणार नाहीत. ते केंद्रात जातील आणि चंद्रकांत पाटील इथे फडणवीस यांची जागा घेतील किंवा पहिली अडीच वर्षे फडणवीस मुख्यमंत्रिपदी राहून नंतर दिल्लीत जातील व नंतर त्या जागी पाटील येऊ शकतील. अर्थात या जर-तरच्या गोष्टी असल्या तरी शेवटी हे राजकारण आहे इथे काहीही घडू शकते.

असे काही झाले तर भाजप शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावेल त्यामुळे उद्धव ठाकरे केवळ आदित्यला मुख्यमंत्री करण्यासाठी हा जुगार खेळतील असे वाटत नाही. पण तरीही सर्वसामान्यांच्या शक्य-अशक्य पलिकडच्या खेळी ही राजकारणी मंडळी खेळत असतात. न जाणो उद्या भाजपनेच शिवसेनेला बाजूला सारुन राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी केली तर? दिवाळी झाली की या सर्व राजकीय घडामोडींना अधिक वेग येईल आणि सत्तेच्या सारीपाटावर दररोज नवनवीन प्रयोग रंगतील.

बघू या पुढे काय काय होतंय…