लुंगी हा शब्द आठवला की पहिल्यांदा डोक्यात येतं ते म्हणजे शिवसेनेचं आंदोलन. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने सुरू केलेली हटाव लुंगी, बजाव पुंगी हे त्यांचं आदोलन फारचं गाजलं. मुंबईतील दक्षिण भारतीयांच्या वर्चस्वाला विरोध हा ६० च्या दशकात शिवसेनेचा मुद्दा होता. त्याचा शिवसेनेला फायदाही मिळाला आणि त्यावर शिवसेना वाढली. त्यावेळी शिवसेनेची ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ ही दक्षिण भारतीयांविरुद्धची घोषणा मुंबईत लोकप्रिय ठरली होती. पण त्याचा इथे संबंध काय हा प्रश्न नक्कीच डोक्यात आला असेल. एकेकाळी विरोधाचं कारण ठरलेली तिच लुंगी आज प्रचाराचं साधनही ठरताना दिसतं आहे. पुढे जाण्यापूर्वी थोडं फ्लॅशबॅकमध्ये पाहिलं तर नक्कीच ६० च्या दशकातल्या लुंगीचा आणि आताच्या लुंगीचा संबंध नक्कीच जोडला जाऊ शकतो याची कल्पना येईल.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली असली तरी मुंबईची नाळ ही महाराष्ट्रापासून वेगळी होत होती. मराठी लोकांच्यासोबतच गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. मुंबईत अनेक उद्योगही उदयास आले असले तरी त्या उद्योगांच्या चाव्या मात्र अमराठी लोकांच्याच हाती होता. मराठी माणसाला दुय्यम स्थान मिळतंय अशी भावनाही त्या काळी जोर धरू लागली होती. व्यापारातही गुजराती, मारवाडी आणि दाक्षिणात्य लोकांना प्राधान्य मिळत असल्यानं मराठी लोकांवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून शिवसेने जन्म घेतला. आपल्या व्यंगचित्रांमधून व्यक्त होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यास सुरूवात केली. त्यानंतर मराठी माणसाला संस्थात्मक पातळीवर एकत्र आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी १ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांना पाठिंबा देण्यासाठी दाक्षिणात्य लोकांविरोधात हटाव लुंगी, बजाव पुंगी ही मोहीम शिवसेनेने सुरू केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे त्या काळच्या शिवसेनेचे समिकरण होतं. आताच्या भूमिकेबाबत विचार न केलेलाच बरा. मराठी माणसाला शिवसेना आपलीशी वाटल्यानंच मराठी माणूसही शिवसेनेशी जोडला गेला आणि राज्यभर त्यांचा वेगाने विस्तारही झाला. ‘मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची’ हे समोरच्या ठणकावून सांगण्याची हिंमतही मराठी माणसाला बाळासाहेबांच्या शिवसेनेनेच दिली.

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…
BJP leaders in Gadchiroli
आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

सध्या ठाकरे कुटुंबातील तिसरी पिढी ही आता राजकारणात उतरली आहे. तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आदित्य ठाकरे हे पहिलेच ठाकरे. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी गुजराती, उर्दू, इंग्रजी आणि अन्य भाषांमधून बॅनर्स लावल्यानं ते चर्चेत आले होते. परंतु आता पुन्हा एकदा दाक्षिणात्य पेहरावातून मतांचा जोगवा मागण्यासाठी गेल्यानं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एकेकाळी शिवसेनेने ज्या लुंगीला विरोध केला त्याच लुंगीचा (वेष्टी) वापर त्यांना मतांना जोगवा मागण्यासाठी करावा लागत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी लुंगीचा विरोध केला आणि दाक्षिणात्य लोकांविरोधात आंदोलन उभारलं होतं. परंतु आज त्यांची तिसरी पिढी याच लुंगीचा (वेष्टी) आधार घेत निवडणुकीच्या प्रचारात फिरत असल्याचा आरोपही आता होताना दिसत आहे. दाक्षिणात्य पेहरावात फिरणारे आदित्य ठाकरे हे नेटकऱ्यांच्याही चर्चेचा विषय ठरले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेच्या भूमिकेत सातत्यानं बदल होताना दिसत आहेत. सत्तेत राहून आपल्याच मित्रपक्षाचा विरोध, जागावाटपावर घेतलेली माघार, मराठीचा मुद्दा अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेनेची भूमिका बदलल्याचं आपल्याला पहायला मिळतं. त्यातच आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांनीदेखील मतांसाठी दाक्षिणात्य पोषाख परिधान करून आपल्याच ‘उठाव लुंगी बजाव पुंगी’ची आठवणं त्या निमित्तानं करून दिली. ज्या लुंगीला मराठी माणसांच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला, तिच लुंगी आज आदित्य ठाकरेंच्या प्रचाराचं साधन ठरतेय यापेक्षा मोठं दुर्देव कोणतं असा सवाल उपस्थित होतोय. हा काळाचा महिमा तर नाही ना असं कुठेतरी आता वाटू लागलंय.

जयदीप उदय दाभोळकर